Breaking news

पवना धरणग्रस्त‍ांसाठी आनंदाची बातमी; बाधित शेतकर्‍यांना चार एकर जागा मिळणार

मावळ माझा न्युज : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज बैठक संपन्न झाली. आज झालेल्या बैठकीत पवना धरणग्रस्तांना पवना धरण परिसरात दोन एकर व जिल्ह्यात दोन एकर जमीन देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविण्याचे आदेश मा. पालकमंत्र्यांनी आज दिले आहेत.

       पवना धरण प्रकल्पातील 340 बाधित खातेदारांचे पुनर्वसन करण्यात आले होते. परंतु उर्वरित 863 खातेदार मागील अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत होते. या संदर्भात मागील चार वर्षांपासून मंत्रालय स्तरावर आमदार सुनिल शेळके यांनी अनेकदा विभागनिहाय बैठका घेत पाठपुरावा केला होता. तसेच विधानसभेत देखील याविषयी आवाज उठविला होता. त्यापुर्वी माजी मंत्री बाळा भेगडे यांनी देखील याबाबत पाठपुरावा केला होता.  मंगळवार दि.9 मे 2023 रोजी सर्व शेतकऱ्यांनी पवना धरणाचे पाणी रोखून एकदिवसीय आंदोलन केले होते. या आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा देण्यात आला होता. त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लवकरच बैठक घेऊन धरणग्रस्तांना न्याय देऊ असा शब्द दिला होता. यावेळी आंदोलन मागे घेण्यात आले होते. 

      त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्व खातेदारांना प्रत्येकी चार एकर जमीन वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळणार आहे. या बैठकीस खासदार श्रीरंगआप्पा बारणे, आमदार सुनिल शेळके, माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन गितांजली शिर्के, अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे, अधिक्षक अभियंता जगताप, पिंपरी चिंचवड आयुक्त शेखर सिंह, पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता विजय पाटील, उपअभियंता अशोक शेटे, शाखा अभियंता अहिरे, उपविभागीय अधिकारी मावळ सुभाष बागडे, तहसीलदार विक्रम देशमुख, पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

इतर बातम्या