लोणावळा शहरात सलग दुसऱ्या दिवशी नगरपरिषदेची धडक अतिक्रमण कारवाई; मुख्य चौक व रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
लोणावळा : पर्यटन नगरी लोणावळा शहरातील दिवसेंदिवस बिकट होत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेने कडक पावले उचलली आहेत. रहदारीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर नगरपरिषदेच्या वतीने धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली असून सलग दुसऱ्या दिवशीही ही मोहीम तीव्रतेने सुरू होती. या धडक कारवाईमुळे शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांनी जणू मोकळा श्वास घेतला आहे.
नगरपरिषदेने १८ नोव्हेंबरपासून लोणावळ्यात या धडक मोहिमेला सुरुवात केली. मोहिमेच्या सुरुवातीला प्रशासनाकडून कारवाई करताना काही प्रमाणात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप नागरिकांमधून झाला होता. मात्र, त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत कोणताही पक्षपात न करता सरसकट कारवाईचा बडगा उचलला. रस्त्याला अडथळा ठरणारी लहान-मोठी सर्व आस्थापने, दुकाने यांवर कठोर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, यामध्ये नगराध्यक्ष आणि काही नगरसेवकांच्या दुकानांचाही समावेश असून त्यांच्यावरही प्रशासनाने निष्पक्षपणे कारवाई केली.
या मोहिमेअंतर्गत कुमार चौक ते भांगरवाडी या शहरातील सर्वात मुख्य आणि वर्दळीच्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविल्याने रस्ता रुंद झाला आहे. त्याचप्रमाणे शहरातील प्रमुख चौकांमधील अनधिकृत अतिक्रमणे काढल्यामुळे वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राजकीय विरोध ते सामंजस्याची भूमिका
लोणावळ्यातील वाहतूक कोंडीची समस्या सर्वश्रुत आहे. रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत असतानाच, सुरुवातीला शहरातील टपरी, पथारी व हातगाडी संघटनांनी या कारवाईला तीव्र विरोध दर्शवला होता. काही राजकीय पक्ष व स्थानिक नेत्यांनी नगरपरिषदेच्या या मोहिमेविरोधात एक दिवसाचे ठिय्या आंदोलनही केले. मात्र, नगरपरिषद प्रशासन कारवाईवर पूर्णपणे ठाम असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर टपरी संघटनेने सामंजस्याची भूमिका घेतली. वाहतुकीला प्रत्यक्ष अडथळा ठरणारी अतिक्रमणे नक्कीच काढा, त्याला आमचा विरोध असणार नाही; परंतु ज्या दुकानांचा रहदारीला अडथळा नाही, ती वाचवा, अशी विनंती संघटनेने केली. नगरपरिषदेने देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर कोणत्याही विरोधाशिवाय कारवाई सुरू झाली होती.
पोलीस बंदोबस्तात शेड व फलकांवर हातोडा
कारवाईच्या दुसऱ्या दिवशी विनापरवाना उभारलेले पक्के ओटे, शेड आणि रस्त्यावर आलेले फलक काढताना काही व्यावसायिक आणि नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकात शाब्दिक चकमक व वाद झाला. मात्र, अनुचित प्रकार टाळण्यासाठी तैनात केलेल्या पोलीस बंदोबस्तात पथकाने आपले काम सुरूच ठेवले. या कठोर कारवाईमुळे अनधिकृत अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांचे नुकसान झाले असले, तरी रस्ते आणि चौक मोकळे झाल्याने लोणावळा शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी आणि पर्यटकांनी नगरपरिषदेच्या या भूमिकेचे जोरदार स्वागत केले आहे. प्रशासनाने केवळ अतिक्रमणे काढून न थांबता, कारवाई केलेल्या भागातील रस्ते तातडीने रुंद करावेत आणि शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
लोणावळा शहरातील वाहतूक कोंडीची गंभीर समस्या सोडवण्यासाठी ही अतिक्रमण विरोधी कारवाई सातत्याने सुरू ठेवली जाईल. कारवाई करताना कोणताही दुजाभाव केला जाणार नाही आणि रहदारीला अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे सरसकट हटवली जातील.
— मनोज पाटील (प्रमुख, अतिक्रमण कारवाई पथक, लोणावळा नगरपरिषद)



















