लोणावळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री पुन्हा पाच दुकानांचे शटर उचकटून १६ हजार २०० रुपयांची रोकड लंपास
लोणावळा : लोणावळा शहरातील साधना कॉम्प्लेक्स परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री पाच दुकानांचे शटर अर्धवट उचकटून रोख रक्कम चोरून नेल्याची घटना सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत चोरट्यांनी एकूण १६ हजार २०० रुपयांची रोकड लंपास केली असून, याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधना कॉम्प्लेक्स येथील रायबा मेन्स वेअर, प्रिंट वन साईज अँड डिजिटल बोर्ड, कुर्ती हाऊस, ब्लू लेडी आणि कॉपर वुड मेन्स वेअर या पाच दुकानांचे शटर अर्धवट उचकटून चोरट्यांनी दुकानांमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुकानांमधील रोख रक्कम चोरून नेली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधना कॉम्प्लेक्स येथील रायबा मेन्स वेअर, प्रिंट वन साईज अँड डिजिटल बोर्ड, कुर्ती हाऊस, ब्लू लेडी आणि कॉपर वुड मेन्स वेअर या पाच दुकानांचे शटर अर्धवट उचकटून चोरट्यांनी दुकानांमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुकानांमधील रोख रक्कम चोरून नेली.
या चोरीमध्ये रायबा मेन्स वेअर दुकानातून ५ हजार रुपये, प्रिंट वन साईज अँड डिजिटल बोर्ड दुकानातून ७०० रुपये, कुर्ती हाऊस दुकानातून १ हजार ५०० रुपये, ब्लू लेडी दुकानातून १ हजार रुपये, तर कॉपर वुड मेन्स वेअर दुकानातून ८ हजार रुपये अशी एकूण १६ हजार २०० रुपयांची रोकड चोरीला गेली आहे.
याप्रकरणी प्रितम भरत ओसवाल (वय ३४, रा. निसर्गनगरी सोसायटी, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार दोन अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (४), ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २८६/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार फटांगडे करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेणे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. सलग पाच दुकानांना लक्ष्य केल्याने साधना कॉम्प्लेक्स परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील पंधरवड्यात लोणावळा नगरपरिषदेच्या स्व. गोपीनाथराव मुंडे व्यापारी संकुलातील पाच दुकाने अशाच प्रकारे फोडण्यात आली होती. वारंवार होणाऱ्या चोऱ्या शहरात सध्या चिंतेचा विषय बनला आहे.


















