Breaking news

लोणावळ्यात रहदारीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर लोणावळा नगरपरिषदेची कारवाई सुरू

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये रहदारीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर लोणावळा नगरपरिषदेकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामध्ये रस्त्यावर आलेले दुकानांचे ओटे, जिने तसेच टपऱ्या, हातगाड्या, दुकानाचे फलक, लोखंडी बोर्ड काढण्यात येणार आहेत.

लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने शहरात 18 नोव्हेंबर पासून ही अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेल्या कुमार रिसॉर्ट व कृष्णाई कॉर्नर येथून या कारवाई मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. कुमार रिसॉर्ट येथील दुकानाचे रस्त्यावर आलेले जिने तसेच कृष्णाई कॉर्नर येथील दुकानाचे फलक व वाढीव ओटे काढण्यात आले. कुमार चौक ते भांगरवाडी दरम्यान ही कारवाई केली जाणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान लोणावळ्यातील या अतिक्रमण कारवाईला शहरातील लोणावळा खंडाळा टपरी हात गाडी व पथारी संघटनेसह बहुतांश राजकीय पक्षांनी विरोध केला होता. त्यानंतर देखील ही कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे पुढे ही कारवाई सुरू राहणार की काही राजकीय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोणावळा नगर परिषदेचे मात्र रहदारीला अडथळा ठरणारी अतिक्रमण ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हटवली जाणार असल्याचे सांगितले आहे. लोणावळा शहरांमधील वाहतूक कोंडी ही सर्वश्रुत आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यास सोबतच पुढील काळामध्ये कुमार रिसॉर्ट ते भांगरवाडी दरम्यान मुख्य रस्ता देखील रुंद केला जाणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये लोणावळ्यातून पुणे ग्रँड सायकल टूर जाणार आहे. या करता देखील जागतिक निकषाप्रमाणे रस्ते बनवण्याचे काम सुरू आहे. हे काम करत असताना तसेच सायकल शर्यत कालावधीमध्ये कोणतेही अडथळे येऊ नये याकरिता देखील या मार्गावर येणारी अतिक्रमणे काढली जाणार आहेत.

लोणावळा शहरामध्ये आजही अतिक्रमण कारवाई होत असताना या कारवाईच्या विरोधात या आंदोलन करत कारवाई न करण्याची मागणी करणाऱ्या विविध संघटना व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्यापैकी आज कोणही बाजारपेठेत उपस्थित नव्हते. नगरपरिषदेने कारवाईला सुरुवात केली मात्र पुढे काही वेळानंतर काही आस्थापनांवर कारवाई न करता पुढे लहान दुकानांवर कारवाई सुरू केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष नासिर शेख यांनी संताप व्यक्त करत रहदारीला अडथळा होत असेल तर सरसकट कारवाई करा चेहरे बघून कारवाई करू नका. काही व्यवसायिकांना त्यांचे साहित्य काढून घेण्यासाठी वेळ दिला जात आहे तर काही सर्वसामान्य नागरिकांवर जेसीबी फिरून साहित्यसह त्यांचे नुकसान केले जात आहे असा दुजाभाव केल्यास शहरात उद्रेक निर्माण होईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. नासिर शेख यांनी याबाबत प्रभारी मुख्याधिकारी गौरव तापकीर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सदरची कारवाई थांबवत नागरिकांना त्यांची अतिक्रमणे व साहित्य काढून घेण्यासाठी दोन तासाचा वेळ देण्यात आला. मात्र या वेळेमध्ये नागरिकांनी त्यांच्या अतिक्रमण व त्यामधील साहित्य काढून न घेतल्यास नगर परिषदे कडून सक्त कारवाई केली जाणार आहे.

इतर बातम्या