लोणावळ्यातील चार नामांकित हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन
लोणावळा : पर्यटननगरी लोणावळ्यातील नामांकित चार मोठ्या हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली असून, अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित हॉटेल्सचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत करण्यात आलेल्या अचानक तपासणीत मुदतबाह्य खाद्यपदार्थ, अस्वच्छ स्वयंपाकगृहे, झुरळांचा वावर तसेच अन्न साठवणुकीतील गंभीर त्रुटी आढळून आल्या.
अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच स्वच्छतेसंदर्भातील Schedule-IV मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्या हॉटेल्समध्ये वलवण येथील कॉन्स्टेलेशन प्रॉपर्टीजचे ‘द ऑर्किड हॉटेल’, तुंगार्ली येथील ‘रिदम लोणावळा’, जुना मुंबई-पुणे महामार्गावरील ‘बेसिलिका हॉटेल’ आणि ‘द फर्न हॉटेल’ यांचा समावेश आहे.
तपासणीदरम्यान द ऑर्किड हॉटेलच्या स्वयंपाकघरात व कोल्ड स्टोरेजमध्ये दुधाची एकूण ११ मुदतबाह्य पाकिटे आढळली. तसेच कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवणे, अस्वच्छ फ्रीज, चॉपिंग बोर्ड, शेगडी, साचलेले पाणी आणि कर्मचाऱ्यांकडे आवश्यक सुरक्षा साहित्याचा अभाव अशा त्रुटी निदर्शनास आल्या.
रिदम लोणावळा येथे मुख्य स्वयंपाकघर व बेकरी विभागात झुरळांचा वावर आढळला. शाकाहारी व मांसाहारी तसेच कच्चे व शिजवलेले अन्न एकत्र साठवले जात असल्याचेही उघड झाले. याशिवाय पेस्ट कंट्रोलची नोंद, अन्न पॅकेजिंग साहित्याचे फूड ग्रेड प्रमाणपत्र आणि कर्मचाऱ्यांचे आवश्यक प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याचे तपासणीत समोर आले.
बेसिलिका हॉटेलच्या कोल्ड स्टोरेजमध्ये मुदतबाह्य चीज व ब्रेड आढळून आले. हे पदार्थ जागेवरच नष्ट करण्यात आले. कच्च्या चिकनमधून रक्तमिश्रित पाणी गळत असल्याचे, अन्नपदार्थ योग्य पद्धतीने साठवले जात नसल्याचे तसेच शाकाहारी व मांसाहारी पदार्थांसाठी स्वतंत्र साठवण व्यवस्था नसल्याचे आढळले. मेनू कार्डवर नोंद नसताना खाद्य रंग व अजिनोमोटोचा वापर केल्याचेही तपासणीत निदर्शनास आले.
द फर्न हॉटेलमध्ये बेकरी उत्पादनांसाठी मुदतबाह्य खाद्य रंग वापरले जात असल्याचे आढळले. संबंधित रंग जागेवरच नष्ट करण्यात आले. फ्रीजजवळ मृत तर फ्रायिंग मशीनजवळ जिवंत झुरळे आढळली. तसेच मसाले व कापलेली फळे विनाझाकण ठेवणे, अस्वच्छ कापडाचा वापर आणि बेकरी मशीनरीची योग्य स्वच्छता न राखणे अशा त्रुटी आढळल्या.
दरम्यान, ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही आस्थापनांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे. हॉटेल व खाद्यपदार्थ व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा परवान्याच्या अटी, स्वच्छता आणि अन्न साठवणुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. अन्यथा परवाना निलंबित करणे अथवा रद्द करण्यासारखी कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या कारवाईमुळे लोणावळ्यातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न सुरक्षा नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.



















