Breaking news

लोणावळा नगरपरिषदेचा पर्यावरण पूरक उपक्रम; खाललेल्या आंब्याचे बाटे घंटागाडीतील स्वच्छ्ता कर्मचाऱ्यांकडे देण्याचे आवाहन

लोणावळा : सध्या उन्हाळ्याचा सिझन सुरू असून सर्वत्र फळांचा राजा आंबा याची लगबग सुरू आहे. घरोघरी सर्वत्रच आंबा खाल्ला जातो मात्र आंबा खाल्ल्यानंतर त्याचा बाटा कोठे न टाकता तो घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या घंटागाडी वरील कर्मचाऱ्याकडे दिल्यास त्याचा निश्चितच सदुपयोग होऊ शकतो. हा पर्यावरण पूरक संदेश घेऊन जागतिक पृथ्वी दिवसाच्या निमित्त लोणावळा नगर परिषदे कडून आज एक पर्यावरण पूरक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

       22 एप्रिल म्हणजेच जागतिक पृथ्वी दिवस, या निमित्त लोणावळा नगरपरिषदचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या संकल्पनेतून  पर्यावरण सेवेसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे. या अंतर्गत आज 22 एप्रिल पासून शहरातील सर्व सामाजिक संस्थांना, हॉटेल, सॅनोटरियम व्यासायिकाना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या आवडीचा फळांचा राजा आंब्याचा सीझन सुरू झालेला असून आपण सगळेच जण आवडीने आंबा खात असतो. आंबा खाल्ल्यानंतर किंवा त्याचा रस केल्यानंतर त्याच्या कोया (आंब्याची बी) इतरत्र न टाकता ते स्वच्छ धुवून त्या आपण दैनंदिन  कचरा घंटागाडीसोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे द्यायचे आहे. गोळा करण्यात येणाऱ्या अशा सर्व कोयांचे टाटा पॉवर संस्था लोणावळा व लोणावळा नगरपरिषद मार्फत बीजरोपण करण्यात येणार आहे. येणाऱ्या 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अशी रोपे शहरातील विविध ठिकाणी लावली जाणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी, विद्यार्थी व नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषदे मार्फत करण्यात आले आहे.

इतर बातम्या