Breaking news

Ekvira Devi : कार्ला गडावर मंगळवारी भाविकांची पुन्हा तुंबळ गर्दी; लांबच लांब दर्शनरांगा

लोणावळा : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी आज मंगळवारी भल्या पहाटेपासून भाविकांनी गडावर मोठी गर्दी केली होती. सकाळी साडेसात वाजताच भाविकांची दर्शनरांग अर्ध्या गडावर पोहचली होती.

    कोरोना साथरोगाच्या प्रभावामुळे मागील दिड वर्षापासून सर्व धर्मीय देवालये बंद होती. एकविरा देवीचे मंदिर देखील दिड वर्षानंतर घटस्थापनेच्या दिवशी उघडल्याने नवरात्र उत्सवात देवीचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक दर्शनासाठी गडावर येत असल्याने लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

   पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख व लोणावळा उपविभागाचे पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी चोख बंदोबस्त नियुक्त केला आहे. मंदिर गाभारा ते कार्ला फाटा दरम्यान हा बंदोबस्त तैनात होता. तसेच भाविकांची वाहने लावण्यासाठी जागोजागी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती. वेहेरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी तसेच व्यवस्थापक मंगेश गायकवाड, बाळासाहेब गायकवाड हे देखील नियोजनात सक्रिय आहेत. भाविकांच्या दर्शनाला व सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक मोरे यांनी सांगितले.

इतर बातम्या