Breaking news

डबल भारत श्री सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित

खोपोली (प्रतिनिधी) : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील पळस्पे महामार्ग पोलीस मदत केंद्रात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरथ असलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांना नुकतेच पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले.

    सुभाष पुजारी हे 2003 साली कोल्हापूर येथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले. तद्नंतर एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन ते 2009 साली पोलीस उपनिरीक्षक पदी रुजू झाले. त्यांनी ऑक्टोबर 2010 ते जुन 2011 नाशिक पोलीस अकादमी येथे पोलीस उपनिरीक्षक पदासाठीचे ट्रेनिंग पूर्ण केले. जुन 2011 ते मे 2018 पर्यंत नवी मुंबई आयुक्तालयांतील पनवेल तालुका पोलीस ठाणे, उरण पोलीस ठाणे, नेरुळ पोलीस ठाणे, पनवेल क्राइम ब्रँच या ठिकाणी नोकरी केली. या दरम्यान कर्तव्य बजावताना अनेक गुन्ह्यांची उकल त्यांनी केली. अनेक सामाजिक उपक्रमात देखिल   त्यांनी सहभाग घेतला. 1 जुन 2018 पासून महामार्ग सुरक्षा पथकात मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे याठिकाणी प्रभारी म्हणून कर्तव्य बजावले. महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध योजना त्यांनी राबविल्या व मृत्यूचा दर घटविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या दरम्यान प्रवाशांना, वाहन चालकांना मदत केली, आरोग्यविषयक शिबिरं राबवली, वाहनचालकांचे प्रबोधन केले. या सर्व  काळाचा आढावा घेतला असता सुभाष पुजारी यांना पोलीस खात्यात आत्तापर्यंत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल 260 बक्षिसे मिळाली आहेत.

      शरीरसौष्ठव खेळामध्ये त्यांनी 2021 व 2022 चा "महाराष्ट्र श्री" व "भारत श्री" किताब सलग दोनवेळा मिळविला. ताश्कंद उझबेकिस्तान या ठिकाणी झालेल्या वर्ल्ड बॉडीबिल्डिंग अँण्ड फिजिक या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये त्यांनी 80 किलो गटामध्ये ब्रान्झ मेडल मिळवले आहे.15 जुलै रोजी मालदीव येथे होणाऱ्या मिस्टर आशिया व नोव्हेंबरमध्ये होणार्‍या "मिस्टर वर्ल्ड" या शरीरसौष्ठवाची स्पर्धेची सध्या ते तयारी करत आहेत. त्यांच्या एकंदर अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना मिळालेल्या पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह प्रदान केले आहे. या बहुमानासाठी पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे तसेच विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

इतर बातम्या