Breaking news

MLA Sunil Shelke : आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून कातकरी बांधवांना जातीचे दाखले वाटप

लोणावळा : मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून टाकवे खुर्द व फांगणे येथील कातकरी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे शनिवारी (दि.3)  फांगणे देवीचे मंदिर येथे वाटप करण्यात आले. यावेळी दिलीप गरुड, संजय गरुड, तेजस्विनी गरुड, आमदार सुनिल शेळके यांचे स्वीय सहाय्यक सचिन वामन, रुपेश सोनुने, नबिलाल आत्तार इ.उपस्थित होते.    

      कातकरी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. मात्र या योजनांचा लाभ घेण्यासाठी कातकरी बांधवांकडे जातीचा दाखला उपलब्ध नसल्याने कातकरी बांधव अशा योजनांपासून वंचित राहतात. कातकरी बांधव प्रामुख्याने ग्रामीण भागातील वाड्या - वस्त्यांवर वास्तव्यास असल्याने त्यांना शासकीय कार्यालयात येऊन जातीचा दाखला मिळविण्यासाठीची किचकट प्रक्रिया पूर्ण करणे देखील शक्य होत नाही. आणि हातावर पोट असलेल्या या नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयात हेलपाटे मारणे परवडणारे नाही. ही बाब लक्षात घेऊन आमदार सुनिल शेळके यांनी मावळ तालुक्यात 'आदिम कातकरी सेवा अभियान' राबवले.

      या अभियानांतर्गत आमदार शेळके यांच्या सहकाऱ्यांनी तालुक्यातील प्रत्येक गावातील वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या कातकरी बांधवांच्या घरी जाऊन जातीच्या दाखल्यांचे अर्ज भरुन घेतले व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कागपत्रांची पूर्तता करून आता टप्याटप्याने कातकरी बांधवांना घरपोच व त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन आमदार सुनिल शेळके यांचे सहकारी जातीच्या दाखल्यांचे वाटप करत आहेत. कातकरी बांधवांसाठी खूप महत्वाचा असणारे जातीचे दाखले त्यांना मोफत घरपोच उपलब्ध होत असल्याने कातकरी बांधवांकडून आमदार सुनिल शेळके यांचे आभार मानले आहेत.

इतर बातम्या