Breaking news

Dattatray Shevale : मावळ पंचायत समिती उपसभापती य‍ांचे सदस्यत्व रद्द; भाजपाला झटका

वडगाव मावळ (प्रतिनिधी) : मावळ पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती दतात्रय शेवाळे यांचे पक्षांतर बंदी कायद्या अंतर्गत सदस्यपद जिल्हाधिकारी यांनी रद्द केले आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर भाजपला यामुळे मोठा फटका बसला आहे

   मावळ पंचायत समितीत भाजपचे 6 सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य आहेत. 31/12/ 2019 ला उपसभापती पदाची निवडणूक झाली. त्यावेळी उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य साहेबराव कारके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गटनेते म्हणून कारके यांनी चारही सदस्यांना व्हीप बजविला होता. परंतू दतात्रय शेवाळे यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेता तसाच ठेवला. निवडणूकीत कारके यांना तीन तर शेवाळे यांना सहा मते मिळाली. भाजपच्या मदतीने शेवाळे उपसभापती झाले. या निवडणूकीनंतर गटनेते साहेबराव कारके यांनी शेवाळे यांच्या विरोधात पक्षांतर बंदी कायद्या अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या कडे केस दाखल केली होती. परंतू कोरोनाची महामारी असल्याने तारीख पे तारीख पडत गेली. त्यामुळे शेवाळे यांना काही दिवस हंगामी सभापती होण्याच्या मान देखील मिळाला असून सध्या ते उपसभापती आहेत.

मामा पाठोपाठ भाच्याचेही पद गेले

दत्तात्रय शेवाळे हे ज्येष्ठ नेते बाळासाहेब नेवाळे यांचे भाचे आहेत. बाळासाहेब नेवाळे यांनी विधानसभा निवडणूकी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला. त्या नंतर त्यांचे भाचे दतात्रय शेवाळे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. परंतू पंचायत समितीत भाजपची सत्ता असल्याने तो मंजूर केला नाही. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपने आपल्या सदस्यांच्या मदतीने शेवाळे यांना उपसभापती केले. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्याने नेवाळे यांना जिल्हा बॅक, जिल्हा दुधसंघ ही दोन्ही पदे सोडावी लागली तर त्यांचे भाचे शेवाळे यांना देखील पंचायत समिती सदस्यपद गमवावे लागले. यामुळे मामा नंतर भाच्याचे देखील पद गेले अशी चर्चा मावळात सुरू झाली आहे.

इतर बातम्या