Breaking news

Public suggestion : लोणावळा शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सुचविले पर्याय

लोणावळा : लोणावळा शहरात मागील काही दिवसांपासून वाहतूककोंडी ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. शनिवार व रविवारी स्थानिक नागरिकांना घराच्या बाहेर पडणे देखील मुश्कील झाले आहे. लोणावळा व परिसरातील नागरिकांचे अर्थाजन पर्यटकांवर आहे हे खरं असलं तरी वाहनं उभी करण्यास जागा असेल तर नागरिक काही खरेदी करण्यासाठी थांबतील ना? जेथे पहावे तेथे वाहतूककोंडी व वाहनांच्या रांगा असे चित्र असल्याने दुकानांच्या समोरून दिवसभरात हजारो वाहने जातात व पण दुकानात कोणी येत नाही. अशा गर्दीचा शहराला उपयोग तरी काय. फक्त आले व गर्दी करून गेले ऐवढेच काय तर पर्यटन शनिवार व रविवारी सुरु आहे. या परिस्थिती मध्ये बदल घडवायचा असेल व वाहतूककोंडी ची समस्या सोडवायची असेल तर प्रशासकीय पातळीवर सर्व यंत्रणांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नागरिकांनी देखील प्रशासनाला सहकार्याची भुमिका ठेवणे गरजेचे आहे असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. केवळ बोलून व सोशल मिडियावर चर्चा करून काही होणार नाही त्याकरिता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करावे लागणार आहे. मावळ माझा च्या वाचकांनी वाहतूककोंडी कमी करण्यासाठी काही पर्याय प्रशासनाला सुचविले आहेत. त्यावर निश्चितपणाने विचार झाल्यास कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

1) गवळवाडी नाक्यावरती जे डिव्हायडर लावले आहेत ते डिव्हायडर पुढे कैलास पर्वत हॉटेल पर्यंत आणि एल अँड टी सेंटर पर्यंत करावे.

2) एल अँड टी च्या जवळील अंबरवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर बाह्यवळण मार्ग फक्त छोट्या वाहनांसाठी असा फलक लावून वलवण कार्ला कामशेत पुणे करिता असे लिहिण्यात यावे व डायव्हर्जन करावे.

3) एक वॉर्डन अथवा वाहतूक पोलीस वलवण येथील एक्सप्रेस हायवे ला जाणाऱ्या वळणावरती उभा करून त्यांच्यामार्फत अवजड वाहने त्यामार्गे वळविण्यात यावीत. त्याठिकाणी बोर्ड लावला आहे याची कल्पना आहे मात्र हा बोर्ड अगदी वळण जागेवरच लावला आहे असाच आणखीन एक बोर्ड पंन्नास मीटर अलिकडे वलवण फाट्याजवळ जवळ लावण्यात यावा.

4) याच ठिकाणी मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीस दाखवण्यात आलेला दिशादर्शक बान हा बदलून लेफ्ट साईड च्या राँप वरती दाखवण्यात यावा.

5) पवना डॅम कुसगाव मार्गे येणारी वाहने आडकर हार्डवेअर पासून एक्सप्रेस हायवे ला वळवण्यात यावेत यासाठी रस्त्यामध्ये दिशादर्शक फलक लावण्यात यावेत.

6) भुशी डॅम मार्गे येणारी व पुणे करिता जाणारी वाहने नवीन पुराणिक स्कीम मार्गे कुसगाव एक्सप्रेस हायवे ला जोडण्यात यावीत. सदर बाबत दिशादर्शक फलक लोणावळा लेक कैलास नगर, बावस्कर बिल्डिंग या भागात लावण्यात यावे. तर मुंबईकडे जाणारी वाहने रायवुड मार्गे पुढे खंडाळा गेट नं. 30 कडे पाठविण्यात यावी.

7) स्थानिक टुरिस्ट टॅक्सीवाले यांना विनंती आहे त्यांनी आपली वाहने पार्किंग मधेच पार्क करावेत सदरचा पार्किंगचा चार्ज आपण ग्राहकाकडून घ्यावा. आपण सदर पार्किंग मालकास विनंती करून त्याच्याकडून कमी पैसे आकारण्यास सांगावे कारण या ठिकाणे आपल्या एका स्थानिक गाडी मागे दहा ते बारा बाहेरील वाहने लागतात.

8) गवळवाडी नाका रेल्वे पुलाजवळ असणारे पार्किंग खुले करून त्यासंदर्भात आवश्यक ते सूचना फलक लावावेत. त्याठिकाणी हाॅटेल व्यावसायिकांची वाहने त्यांच्या पार्किंगमध्ये लावण्याच्या सूचना कराव्यात.

9) भांगरवाडी इंद्रायणी पूल मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत एकेरी वाहतूक वनवे पुन्हा चालू करावा.

10) बाजार पेठ भागात सम विषम तारखेस पार्किंग सक्तीचे करावे.

11) वडगाव तळेगाव कामशेट यामार्गे येणारी वाहने वरसोली येथे टोल भरून सरळ लोणावळा मार्गे पुढे जातात कारण त्यांना एक्सप्रेस हायवे चा पुन्हा टोल भरावा लागतो. वरसोलीची पावती एक्सप्रेस टोल नाक्यावर ग्राह्य धरल्यास वाहने शहरांमध्ये न येता एकच टोल भरून पुढे निघून जातील.

12) औंढे रोड पासून केवरे रेल्वे गेट कडे जाणाऱ्या रस्त्याला जर जुना मुंबई पुणे मार्ग दर्शविणारा दिशादर्शक फलक लावल्यास केवरे नांगरगाव इंडस्ट्री मार्गे वाहने जुना मुंबई पुणे रोड ला येतील. (सदर रेल्वे गेट हे सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालू असते सदर बाबत रेल्वे प्रशासनाशी बोलून कालावधी वाढवून घेऊ शकतो  याचा पाठपुरावा करावा लागेल).

13) पावसाळ्यात वाहतूक नियोजनासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविणे. स्थानिक नागरिक, राजकीय पक्ष व सामाजिक संघटना, मंडळे यांच्याशी चर्चा करत स्वंयसेवकांची मदत घ्यावी.

   वरील मुद्दयांवर विचार करावा व अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य केल्यास निश्चित लोणावळ्यातील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

इतर बातम्या