Pawna Dam Update l मावळ तालुक्यातील पवना धरणामध्ये 69 टक्के पाणीसाठा

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ तालुक्यातील पवना धरणामध्ये आज पर्यंत 69.11 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 50 टक्के अधिक पाणीसाठा धरणात आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर व मावळ तालुक्यात ज्या भागात पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो त्या परिसरातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. यावर्षी जुलै महिन्यातच पवना धरण 100% भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी पवना धरण क्षेत्रामध्ये आजपर्यंत 1052 मिलिमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे. तर मागील वर्षी आज अखेरपर्यंत केवळ 325 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.
लोणावळा व मावळ परिसरामध्ये मागील महिनाभरापासून जोरदार पाऊस सुरू असल्याने मावळ तालुक्यातील बहुतांश सर्व धरणे पूर्ण भरण्याच्या जवळपास आली आहेत. त्यामुळे मावळ तालुका व आजूबाजूच्या परिसरातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. या पुढील काळामध्ये होणारा पाऊस हा पूरस्थिती निर्माण करणारा असणार आहे. धरण साठे भरल्यानंतर धरणातील पाणी हे नदीपात्रामधून विसर्जित केले जाते. त्यामुळे नदीपात्रांच्या आजूबाजूला असलेल्या गावांना व रस्त्यांना पुराचा विळखा पडतो. वडिवळे धरणामधून होत असलेला विसर्ग थांबवण्यात आला आहे.