Breaking news

आर्यन खानचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : क्रुझवरील अमलीपदार्थ प्रकरणात अटकेत असलेल्या सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह तिघांचा जामीन अर्ज आज महानगर दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला. "या अर्जावर विशेष न्यायालयात सुनावणी होऊ शकते, असे स्पष्ट करून न्यायालयाने जामीन नामंजूर केला". यामुळे आर्यनचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

   आर्थर रोड कारागृहात आर्यनला ( 23) ठेवण्यात आले असून आता त्याच्या वतीने विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला जाईल. दंडाधिकारी न्यायालयाने त्याला गुरुवारी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

एनसीबीच्या वतीने जामीन अर्जाला तीव्र विरोध करण्यात आला. जामीन अर्जावर विशेष सत्र न्यायालयात सुनावणी व्हायला हवी. जर एका आरोपीकडे ड्रग्ज सापडले आणि इतरांकडे सापडले नाही तरी त्या सर्वांना एकाच एफआयआरमध्ये अटक झाली आहे हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे या अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी व्हायला हवी, असा युक्तिवाद अतिरिक्त सौलिसिटर जनरल अनील सिंह यांनी केला.

    मात्र या युक्तिवादाचे खंडन आर्यनच्या वतीने अँड. सतीश मानेशिंदे यांनी केले. उच्च न्यायालयात जामीन अर्ज केल्यावर अल्प प्रमाणात अमलीपदार्थ आढळले तर न्यायालय जामीन मंजूर करते. आर्यनकडे काहीही आढळले नाही तरी त्याला जामीन का नाही, असा बचाव त्यांनी केला. आर्यन चांगल्या घरातील मुलगा आहे, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, समाजाशी त्याचे नाते आहे आणि तो फरार होणार नाही. तो पुरावे प्रभावित करणार नाही, पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक पुरावे ताब्यात घेतले आहे, मग त्याला कोठडीत का ठेवायचे असा युक्तिवाद त्यांनी केला. दंडाधिकारी आर एम नेर्लेकर यांनी पाच तासांच्या सुनावणीनंतर जामीन अर्ज, या न्यायालयात दाखल होऊ शकत नाही, अन्य न्यायालयात होऊ शकतो, असे निरीक्षण नोंदवून जामीन नाकारला. आर्यनसह आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमून धनेचा यांचाही जामीन न्यायालयाने नामंजूर केला. आता तिघेही विशेष सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करतील, असे त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आले.

एनसीबीने या प्रकरणात आतापर्यंत एकूण 18 जणांना अटक केली आहे. मुंबई हून गोव्याला जाणाऱ्या आलिशान क्रुझमध्ये एनसीबीने छापा मारुन नऊ मुले आणि तीन मुलींना अटक केली आहे. यामध्ये आर्यनचा समावेश आहे. मात्र त्याला या क्रुझवर बोलविण्यात आले होते तो स्वतः हून गेला नाही आणि केवळ वाॅटसअप चॅटवरुन त्याला अटक केली आहे, असा युक्तिवाद त्याच्या वतीने करण्यात आला आहे.

इतर बातम्या