Breaking news

लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयाचा 26 वर्षानंतर माजी विद्यार्थी स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

लोणावळा : लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयात, शनिवारी (13 एप्रिल) तब्बल 26 वर्षानंतर सन 1997 ते 2024 या वर्षातील माजी विद्यार्थी व माजी व कार्यरत शिक्षकांचा स्नेहमेळावा माजी विद्यार्थी संघाने विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळकृष्ण बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता. स्नेहमेळाव्यास 400 हून अधिक माजी विद्यार्थी व 20 गुरुजन उपस्थित होते.

     आम्ही तुमच्यामुळे‌च घडलो हे भाव मनी जपत आपोआप कित्येक जणांचे हात गुरुजन वर्गाच्या पायापर्यंत जात होते. वर्गमित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता.

    सकाळी नऊ वाजता शाळेत माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर त्यांनी उपस्थिती घेऊन नावनोंदणी करण्यात आली. सर्व माजी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व शालेय बॅज देऊन स्वागत करण्यात आले. सर्वांनी नाश्ता व चहाचा आस्वाद घेताना शाळेतील मस्ती, एकत्रित खाल्लेला डब्बा, केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शिक्षकांनी दिलेल्या शिक्षा, शाळेतील क्रीडास्पर्धा, स्नेहसंमेलने, स्काऊट गाईड शिबीरे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची धूम या विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

     कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीपूजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आली. माजी विद्यार्थीनी वर्षा देसाई फाले हिने आपल्या सुरेल आवाजात ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी शाम सुतार यांनी केली. विद्यार्थी मनोगतामध्ये लोणावळा नगरपरिषदेने 1997 साली सुरु केलेली ही शाळा आमची दुसरी आई आहे. या विद्यालयातून ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांनी आम्हाला घडवले, सुसंस्कृत केल्यामुळेच आम्ही आज आदर्श नागरिक म्हणून समाजात वावरत आहोत. आज मेळाव्यामुळे आम्ही 26 वर्षानंतर सर्व शाळामित्र एकत्र जमलो याचा मनस्वी आनंद होत असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. आज‌चा दिवस आमच्यासाठी खास आहे. अविस्मरणीय असल्याचे सांगितले. विद्यालयाचे आजी माजी गुरुजनांचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान विद्यार्थी वर्गाने केला. उपस्थित गुरुजनांनी आपली मनोगते व्यक्त करताना सुंदर नियोजन, विविधांगी कार्यक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण बलकवडे यांनी विद्यालय ही ज्ञानदान देणारी एक मोठी नौका आहे व तुम्ही-आम्ही त्यातील सह‌प्रवासी आहोत. नावाडी शिस्तबध्द असला तर प्रवासी आपोआप शिस्तबद्ध होतात, एखाद-दुसरा चुकार असेल तर त्याला सुधारण्याचे काम गुरुजन करतात. त्यात तुम्ही जीवनाच्या परीक्षेत सदैव यशस्वी व्हावे, उत्तम नागरिक व्हावे हा उद्देश असतो असे सांगितले.

     दुपारच्या सत्रात विद्यालयातील माजी विद्यार्थीनी वर्षा देसाई हिचे सुरेल मंत्रमुग्ध गायन, नृत्यदिग्दर्शक विकास जैस्वाल व सहकारी यांचा सुंदर नृत्याविष्कार व विद्यालयाची माजी विद्यार्थीनी व प्रसिद्ध सिनेतारका मोनालिसा बागल हिच्या उपास्थिती व अदाकारीने कार्यक्रमाला चार चाँद लागले. सदर मैफलीच्या वेळीस सर्वांनी उत्तम स्नेह‌भोजनाचा आनंद लुटला. शेवटच्या सत्रात माजी विद्यार्थीनींसाठी फॅन्सी गेम्स अर्थात पैठणीचा खेळ मुख्याध्यापक बलकवडे सर यांनी पारीठे सर व पठाण सरांच्या सहकार्याने घेतला. या खेळात अनुक्रमे तृप्ती ससाणे, आश्विनी कडू, संतोषी नाणेकर व रुपाली घनवट या पैठणीच्या मानकरी ठरल्या.

      सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत असा तब्बल 9 तास कार्यक्रम नियोजनबद्ध चालला. शेवटी केक कापून व वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी माजी विद्यार्थी विकास कांबळे व शाम सुतार यांनी उत्कृष्ट सूत्रसंचलन केले. तर उर्मिला मंगवडे हिने आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संघाबरोबरच शिक्षक देवराम पारीठे व अमजद पठाण यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुंदर नियोजन व आयोजनाबद्दल, तसेच सर्व माजी विद्यार्थी व गुरुजनांची भेट घडवून आणल्याबद्दल सर्वांनी मुख्याध्यापक बाळकृष्ण बलकवडे सरांचे आभार मानले.

इतर बातम्या