भांगरवाडी येथे देविदास कडू व सुषमा कडू यांच्या वतीने आयोजित हळदी कुंकू समारंभास महिलांची अभूतपूर्व गर्दी

लोणावळा : भांगरवाडी येथे भाजपा माजी नगरसेवक देविदास कडू व नेतृत्व महिला बचत गटाच्या संस्थापक अध्यक्षा सुषमा देविदास कडू यांच्या वतीने वसंत पंचमीच्या दिवशी आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभास महिलांची अभूतपूर्व गर्दी झाली होती. हळदी कुंकू व वाण घेण्यासाठी महिलांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत महिलांची ही गर्दी कायम होती. आमदार सुनील शेळके यांच्या सौभग्यवती सारिका सुनील शेळके, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष रेणू येळगावकर यांच्यासह लोणावळ्यातील विविध पक्षांच्या अध्यक्षा, माजी नगरसेविका, विविध क्षेत्रातील महिला भगिनी तसेच लोणावळा शहरातील महिलांनी उपस्थिती लावली होती. जवळपास आठ हजारांहून अधिक महिलांनी या हळदी कुंकू समारंभास हजेरी लावली होती.
मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिलाच सण. या मकर संक्रांत सणापासून रथसप्तमी पर्यंत तिळगुळ वाटप व हळदीकुंकू समारंभ केले जातात. कडू परिवाराकडून आयोजित हळदी कुंकू समारंभास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत एकमेकींना सौभाग्याचा लेणं असलेले हळदीकुंकू लावत तिळगुळ पान सुपारी वाटप करत या कार्यक्रमाचा आनंद घेतला. हळदी कुंकू समारंभ हा हिंदू संस्कृतीमधील एक पारंपारिक सण आहे. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये हळदीकुंकू ला विशेष असे महत्त्व आहे. या समारंभाच्या निमित्ताने वेगवेगळ्या भागातील महिला एकत्र येतात व एकमेकींना हळदीकुंकू देतात.