Breaking news

Lonavala News : हिंदू नववर्षांच्या स्वागतासाठी लोणावळ्यात भव्य शोभायात्रा संपन्न

लोणावळा : गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षांच्या स्वागतासाठी लोणावळ्यात हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण यांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते. सुमारे दिड ते दोन हजार दुचाकी गाड्यांवरुन तीन ते साडेतीन हजार हिंदू बंधू भगिनी या शोभायात्रेत सहभागी झाले होते. पुरंदरे शाळा मैदानातून ही शोभायात्रा सुरु होते वाकसई येथे समारोप झाला.

     रॅलीमध्ये सर्वात पुढे भारत मातेची प्रतिमा, त्यानंतर दुचाकीवरील महिला भगिनी, त्या मागोमाग प्रभू श्रीराम यांची प्रतिमा व आयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती असलेला रथ तदनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा रथ व त्या मागोमाग दुचाकीवरील पुरुष सर्वात मागे डिजे व रुग्णवाहिका असे रॅलीचे स्वरुप होते. पुरंदरे मैदानाहून सदर रॅली ही छत्रपती शिवाजी महाराज चौक, जयचंद चौक, मावळा पुतळा चौक, भगवान महावीर चौक या मार्गे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाने खंडाळा तलावापर्यत गेली. त्याठिकाणी निलकंठेश्वर मंदिरासमोरुन फिरुन ती पुन्हा गवळीवाडा येथे आली. मिनू गॅरेज मार्गे शोभायात्रा इंदिरानगर वरुन तुंगार्ली गावात, नारायणी धाम पोलीस चौकीसमोरुन वलवण गावात व मनशक्ती जवळून पुन्हा मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर येत वरसोली, वाकसई चाळ मार्गे वाकसई फाटा येथे गेली. त्याठिकाणी शोभायात्रेचा समारोप झाला. समारोपाच्या ठिकाणी गुढीपाडवा या हिंदू नववर्ष दिनाचे महत्व व महात्म्य सांगण्यात आले. 

   अतिशय नियोजनबद्ध पद्घतीने ही शोभायात्रा काढण्यात आली होती. सकाळी अकरा वाजता शोभायात्रेला सुरुवात झाली. सर्व दुचाकी वाहनांना भगवे ध्वज लावण्यात आले होते. प्रत्येकाने डोक्यावर भगवा फेटा परिधान केला होता तसेच पारंपारिक वेषभूषा केली होती. लहान मुले, महिल‍ा, युवक, तरुण व ज्येष्ठ सर्वच जण या शोभायात्रेत सहभागी झाले होते. मागील पंधरा दिवसांपासून हिंदू समितीच्या माध्यमातून या शोभायात्रेचे नियोजन करण्यात आले होते. 

निवडणुका लांबल्याने राजकारणी झाले गायब

मागील वर्षी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत राजकीय मंडळी मोठ्या संख्येने हिंदू नववर्षांच्या शोभायात्रेत सहभागी झाले होते. आतामात्र निवडणुका लांबणीवर पडल्याने राजकीय मंडळींनी हिंदू समितीच्या या नववर्षांच्या शोभायात्रेकडे पाठ फिरविल्याचे चित्र आज पहायला मिळाले. केवळ मतांवर डोळा ठेवून राजकारण करण्याच्या या हिंदू राजकारण्यांच्या मानसिकतेमुळे आज खर्‍या अर्थाने हिंदू समाज मागे पडू लागला आहे.

पोलीसांच्या नियोजनाची बोंब

हिंदू समितीच्या वतीने दरवर्षी गुढीपाडव्याला भव्य शोभायात्रा काढली जाते. याबाबतचे व मार्ग कसा असेल याबाबत पोलीस प्रशासनाला कळविलेले असताना देखील आज पोलिसांच्या नियोजनांची बोंब पहायला मिळाली. शहरातील सर्वात महत्वाच्या व पोलीस ठाण्यापासून केवळ शंभर मिटर अंतरावर असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकही पोलीस कर्मचारी हजर नव्हता. शोभायात्रा समोरुन येत असताना दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एक चारचाकी वाहन तब्बल पाऊण तास रस्त्याच्या मधोमध उभे होते मात्र ती गाडी टोचन लावून बाजुला घेण्याऐवजी केवळ फोटो काढत बघ्याची भूमिका पोलीस कर्मचार्‍यांनी घेतली. सदर वाहनामुळे शोभायात्रेला अडथळा निर्माण झाला होता. संख्याबळ कमी असल्याचे कारण देत पोलीस प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचा प्रकार पहायला मिळाला.

इतर बातम्या