Breaking news

कुसगाव खु. येथे धबधब्याजवळील डबक्यात बुडून दोन मुल‍ांसह वडिलांचा मृत्यू

लोणावळा : मावळ तालुक्यातील कामशेत जवळील कुसगाव खुर्द येथील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पाण्याच्या एका खोल डबक्यात दोन लेकरांसह वडिलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज रविवारी (25 जुलै) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दुर्देवी घटना. या घटनेमुळे कुसगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    पिराजी गणपती सुळे (वय- 45), साईनाथ पिराजी सुळे (वय- 14), सचिन पिराजी सुळे (वय-11 तिघेही रा. सध्या इंद्रायणी काॅलनी, कामशेत, मावळ, मूळ रा. नायगाववाडी  जि.नांदेड ) असे बुडून मृत्यू झालेल्या बापलेकांची नावे आहेत.

    कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज रविवारची सुट्टी असल्याने पिराजी हे सकाळी दहा  वाजण्याच्या सुमारास मोठा मुलगा साईनाथ व छोटा मुलगा सचिन या दोघांना घेऊन जवळच असलेल्या कुसगाव खुर्द येथील धबधबे पहायला गेले होते. धबधब्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेल्या जागेत मोठ मोठी डबकी तयार असून, ती पाण्याने तुडुंब भरली आहे. या पैकी एका पाण्याच्या डबक्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोन्ही मुले बुडू लागली. या दोन्ही मुलांना वाचविण्याचा पिराजी यांनी अतोनात प्रयत्न केला होता. पण अखेर त्यांची दमछाक झाल्याने दोन लेकरांसह त्यांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

   या डबक्याच्या परिसरात जनावरे चारण्यासाठी घेऊन आलेल्या एका शेतकऱ्याने त्यांना बुडताना पाहिले आणि  त्यांनी आरडाओरड केला. त्यांचा आरडाओरड ऐकून गावकरी घटनास्थळी गोळा झाले. गावकऱ्यांनी त्यांना डबके व  त्यातील चिखलाच्या दलदलीतून बाहेर काढले. परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. पोलीस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच गावकऱ्यांनी तिघांना बाहेर काढले होते. या घटनेचा पुढील तपास कामशेत पोलीस करीत आहे.

इतर बातम्या