Breaking news

लोणावळा सायकल क्लबच्या आठ सदस्यांनी केली लोणावळा पंढरपुर सायकल वारी पुर्ण; 13 वर्षाच्या मुलाचाही समावेश

लोणावळा : आषाढी एकादशीच्या निमित्त लोणावळा सायकल क्लबच्या आठ सदस्यांनी लोणावळा ते पंढरपुर व पुन्हा लोणावळा अशी सायकल वारी पुर्ण केली आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये वलवण गावातील एका 13 वर्षाच्या मुलाचा देखील समावेश होता.

   शुक्रवारी पहाटे 6.30 वाजता वलवण गावातील महादेव मंदिरापासून सायकल क्लबचे सदस्य भरत भरणे, नितेश कुटे, संतोष अंभूरे, अमोल तावरे, पांडूरंग खुटवड, तेजस बिडकर, प्रकाश धनकवडे व 13 वर्षाचा लाडू उमेश तारे या आठ जणांनी ज्ञानोबा तुकाराम नामाचा जयघोष करत सायकल वारीला सुरुवात केली. सासवड येथे काही क्षणांची विश्रांती घेत, त्यांनी लोणंद येथे मुक्काम केला. मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी याठिकाणी राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली होती. दुसर्‍या दिवशी पुन्हा सकाळी प्रवासाला सुरुवात करत हे सदस्य शनिवारी रात्री 10.30 वाजता पंढरपुरात दाखल झाले. रात्रीच चंद्रभागेत स्नान करून टिमने मंदिरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले. लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दर्शनाची व्यवस्था केली होती. त्याठिकाणी सिंहगडचे दीपक बडगुजर यांनी सर्वांची सिंहगडच्या रेस्ट हाऊसवर राहण्याची व्यवस्था केली होती. लोणावळ्यातील उद्योजक रमेश पाळेकर यांनी या सर्व प्रवासात सदस्यांना याकामी महत्वाची मदत केली. 

   रविवारी सकाळी पुन्हा दर्शन व मंदिर प्रदक्षिणा करत टिमने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. यवत व लोणी काळभोर दरम्यान त्यांचा रात्रीचा मुक्काम व निवृत्त पोलीस उपनिरीक्षक दिलीप होले यांच्या माध्यमातून जेवणाची सोय करण्यात आली होती. सोमवारी सकाळी टिम यवतवरून लोणावळ्याकडे रवाना होत रात्री 12.30 च्या दरम्यान लोणावळ्यात दाखल झाली.

    सुमारे 550 किमी अंतराचा हा प्रवास लोणावळा सायकल क्लबच्या सदस्यांनी पार परत पांडूरंगाचे दर्शन घेतले. देशावर व राज्यावर आलेले कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे व भाविकांना पुढील वर्षी तुझ्या दर्शनाला आनंदाने वारीने येऊ दे. राज्यात चांगला पाऊस होऊ दे असे साकडे या टिमने पांडूरंगाच्या चरणी घातले आहे.

मावळ माझा बातमीपत्राचा वाॅटसअप ग्रुप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

इतर बातम्या