Breaking news

लोणावळ्यातील डाॅ. खंडेलवाल दरोडा प्रकरणी 15 जणांना अटक; 31 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

लोणावळा : लोणावळा शहरात 17 जुनच्या पहाटे डाॅ. हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर दरोडा टाकत 67 लाखांचा मुद्देमाल लंपास केलेल्या दरोडेखोरांना पकडण्यात पुणे ग्रामीणच्या एलसीबी पथकाला यश आले आहे. पोलीस पथकाने याप्रकरणी 15 आरोपींना अटक केली असून दोन अल्पवयीन बालके ताब्यात घेण्यात आली आहे. त्यांच्याकडून 30 लाख 50 हजार 200 रुपये व चोरीच्या पैशातून विकत घेतलेले 57 हजार 500 रुपयांचे तीन मोबाईल संच ताब्यात घेतले असल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

     लोणावळा शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रधानपार्क सोसायटीमध्ये हा दरोड्याचा प्रकार घडला होता. डाँ. खंडेलवाल व त्यांची पत्नी हे ज्येष्ठ दोघे त्यांच्या खोलीत झोपेलेले असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सिनेमा स्टाईलने घरात घुसलेल्या या दरोडेखोरांनी त्यांना हत्यारांचा धाक दाखवत त्यांचे हात बांधून त्यांच्या डोळ्यासमोर घरातील 50 लाखांची रोकड व सोन्या चांदीचे दागिणे असा 66 लाख 77 हजार 500 रुपयांचा ऐवज पळविला होता. घरामधून बाहेर जाताना त्या चोरट्यांची छबी बंगल्याच्या सिसीटिव्ही मध्ये कैद झाली होती तसेच चौकांमधील सिसीटिव्ही मध्ये आरोपी कैद झाले होते.

    अतिशय गंभिर स्वरुपाचा हा गुन्हा असल्याने कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया व पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनय देशमुख यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधिक्षक विवेक पाटील, सहायक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे व नेताजी गंधारे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घोडगे व अमोल गोरे यांचेसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदार यांची तपास पथके बनवत तपास सुरू केला होता. गुन्ह्याच्या ठिकाणचे व आजुबाजुच्या परीसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आणि गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकांनी गुन्हयाचा लोणावळा, मुंबई, सांताक्रूझ, हडपसर, पुणे शहर, अंधेरी, मालाड मुंबई येथे तपास करून एकुण 8 आरोपींना यापुर्वीच अटक केली होती. परंतु त्यांचेकडे तपासात गुन्हयातील मुख्य आरोपी हे मध्यप्रदेशात असून त्यांचेकडेच गुन्ह्यातील चोरीला गेला माल असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उप निरीक्षक रामेश्वर धोंडगे व पोलीस अंमलदार सुनिल जावळे, शब्बीर पठाण, मुकुंद अयाधित, मंगेश थिगळे, बाळासाहेब खडके, मुकेश कदम, प्रकाश वाघमारे, महेश गायकवाड, निलेश कदम, अक्षय नवले यांचे तपास पथक मध्यप्रदेश येथे आरोपीचे शोधात 3 आठवडे तळ ठोकून होते. या पथकाने तसेच सचिन गायकवाड, राजु मोमीन यांच्या तांत्रिक मदतीने मध्यप्रदेश मधील सागर जिल्हयातील गंज बासौदा, राहतगड, सागर डांबरी येथे तपास करून गुन्हयातील 5 मुख्य आरोपी व 2 विधीसंघर्षीत बालके यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून गुन्हयातील चोरीला गेलेल्या मालापैकी 30 लाख 52 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल यामध्ये 6 लाख 26 हजार रोख व 23 लाख 68 हजार 700 रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिणे, गुन्ह्यातील 57 हजार 500 रुपयांचे विकत घेतलेले 3 मोबाईल फोन जप्त केले आहेत. 

   गुन्हयातील मुख्य आरोपी हेमंत रंगराज कुशवाह हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गोवा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र व उत्तरप्रदेश या राज्यात घरफोडी, चोरी चे गुन्हे दाखल आहेत. 

अटक आरोपींची नांवे

हेमंत रंगराज कुशवाह (वय 24 रा. डाबरी ता. राहतगड जि. सागर मध्यप्रदेश), मधु साधु विश्वासराव देशमुख (वय 52 वर्षे रा. औंढोली ता. मावळ जि. पुणे), सुनिल शंकर शेजवळ (वय 40 वर्षे सध्या रा. घाटकोपर वेस्ट मुंबई मुळ रा. लाखनगाव ता. आंबेगाव जि. पुणे), रविंद्र काशीराम पवार वय 42 वर्षे रा. संभाजीनगर, अंधेरी वेस्ट मुंबई), शामसुंदर शिवनाथ शर्मा (वय 43 वर्षे रा. आरे मिल्क कॉलनी, गोरेगाव पूर्व, मुंबई), मुकेश रमेश राठोड (वय 45 वर्षे रा. भटवाडी, मचड़ी मार्केटजवळ घाटकोपर वेस्ट मुंबई), सागर रमेश धोत्रे (वय २५ वर्ष शंकर मठ, हडपसर पुणे), प्रशांत उर्फ हेमंत रंगराज कुसवाह उर्फ पटेल (वय 27 वर्षे रा. डाबरी पो. चंद्रापुर ग्रामपंचायत बहादुरपुर ता. राहातगड जिल्हा सागर, राज्य मध्यप्रदेश), दिनेश जयराम अहिरे (वय 38 वर्षे रा. कमला तिवारी चाल पारशीवाडी, घाटकोपर (प) मुंबई), विकास शंकर मुख्य (वय 34 वर्षे रा. सांताक्रुझ पूर्व, वाकोला, मुंबई), संजय भगवान शेंडगे (वय 47 वर्षे रा. जवाहरमाई प्लॉट, भटवाडी, घाटकोपर (प) मुंबई), दौलत भावसिंग पटेल (वय 24 वर्षे रा. डाबरी पो. चंद्रापुर ग्रामपंचायत बहादुरपुर ता. राहातगड जिल्हा साजर, राज्य मध्यप्रदेश), विजय चंद्रप्रकाश पटेल (वय 21 वर्षे रा. वल्लभनगर वार्ड, शाहु चौक, जिल्हा सागर राज्य मध्येप्रदेश),  गोविंद यामसिंग कुशवाह (वय 18 वर्षे रा. डाबरी पो. चंद्रापुर ग्रामपंचायत बहादुरपुर ता. रहातगड जिल्हा सागर, राज्य मध्यप्रदेश), प्रदिप लल्लु धानुक (वय 28 वर्षे रा. डाबरी पो. चंद्रापुर ग्रामपंचायत बहादुरपुरा रहातगड जिल्हा सागर राज्य मध्यप्रदेश)

इतर बातम्या