Breaking news

Maval News | वडगाव मावळ मधील गुटखा विक्रेत्यावर कारवाई; सुमारे दीड लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांविरोधात गुन्हा दाखल

लोणावळा : लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने वडगाव मावळ येथे 1 मे च्या रात्री 1 वाजण्याच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात 1 लाख 37 हजार 677 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी दिली.

     याविषयी बोलताना आयपीएस कार्तिक म्हणाले, वडगाव मावळ येथे मोठ्या प्रमाणावर शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्रीकरिता साठवणूक करण्यात आली असल्याची गुप्त माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी (1 मे)  रात्री 1.10 वाजता बातमीच्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यामध्ये वडगाव मधील केशवनगर भागातील एका खोलीमध्ये दिब्यांशू श्रीमुलचंद धारिया (वय 21 वर्ष, राहणार केशवनगर, वडगाव) यांच्या ताब्यातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा 1 लाख 37 हजार 677 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. आरोपीचा साथीदार तनविर शेख (राहणार केशवनगर, वडगाव मावळ) हा पोलिसांची चाहूल लागताच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाला आहे. 

       सदरचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींविरोधात वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून भादवि कलम 328,272,273,34 सह अन्न सुरक्षा अधिनियम 2006 चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत. सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पो.हवा.अंकुश नायकुडे, पो.हवा. नितेश कवडे, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे यांचे पथकाने केली आहे.

इतर बातम्या