Kaivalydham News l कैवल्यधाम योग संस्थेत योगा इन कॅन्सर केअर या विषयावर 11 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेला सुरुवात
लोणावळा : येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कैवल्यधाम “योग संस्थेत योगा इन कॅन्सर केअर” या विषयावरील 11 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेला आज 5 डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे. पुढील तीन दिवस ही परिषद चालणार असून यामध्ये योगा आजारावर योगाच्या माध्यमातून कशाप्रकारे मात करायची या विषयावर विचार विनिमय होणार आहे. आयुष मंत्रालय नवी दिल्ली, इंडियन योगा असोशिएशन नवी दिल्ली व टाटा मेमोरियल सेंटर मुंबई व कैवल्यधाम योग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ. पंकज चतुर्वेदी, कैवल्यधाम योग संस्थेचे अध्यक्ष डॉ. ओम प्रकाश तिवारी, कैवल्यधाम संस्थेचे सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, डॉ. सतबीर खालसा, डॉ. पो. जु. लिन आणि डॉ के. एस. गोपीनाथ यांच्या प्रमुख उपस्थित या परिषदेचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. पंकज चतुर्वेदी म्हणाले, आम्ही मेडिकल सायन्स मधून कॅन्सरला हरवले आहे पण आपण योगाने कॅन्सर रुग्णांना वाचवले आहे. त्यांना नवीन जीवन दिले आहे. योगाची जी परंपरा आहे ती आता वाढू लागली आहे. युवा पिढी याकडे आकर्षित होत आहे ही चांगली गोष्ट आहे. योगा संस्कृती ही भारताची आहे मात्र त्याचे महत्व विदेशीना समजले आहे. आपण तो कधी आत्मसात करणार, आपल्या घरातील मोठ्या व्यक्ती आपल्याला सात्विक भोजना विषयी सांगतात त्याकडे आपण दुर्लक्ष करतो मात्र तेच दुसऱ्यांनी सांगितले की आपण ते आत्मसात करतो. आपले पूर्वपार चालत आलेली जीवनशैली हीच सर्वोत्तम जीवनशैली आहे. त्यासाठी वेगळे डायट करण्याची गरज नाही.
मन हे शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. ते निरोगी राखणे गरजेचे आहे तर शरीर निरोगी व स्वस्थ राहील. चुकीचे विचार व चुकीच्या सोबती सोडून द्या, मन चांगले होईल असे डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितले. शरीर आल्हाददायी राहील. व्यक्ती जे आपले कडे नाही त्याबाबत जास्त विचार करतो त्यामुळे शरीरावर परिणाम होतो. कॅन्सर हा आजार कमी करण्यासाठी योग महत्वपूर्ण आहे असे त्यांनी सांगितले.
डॉ. सतबीर खालसा, डॉ. पो. जु. लिन आणि डॉ के. एस. गोपीनाथ यांनी देखील त्यांची मनोगते व्यक्त केली. प्रास्तविक सादर करताना कैवल्यधामचे सुबोध तिवारी म्हणाले, मागील एक वर्षापासून ही परिषद आयोजित करण्याचा प्रयत्न सुरू होता. संस्थेत योगाचा कॅन्सर आजारातून बाहेर पाडण्यासाठी कसा उपयोग होतो यावर परीक्षण करण्यात आले आहे. त्या क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन येथील डॉक्टर व शिक्षक यांना मिळावे याकरिता ही परिषद लाभदायक ठरणार आहे.
परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी, कैवल्यधाम संस्थेचा माहितीपट दाखविण्यात आला. या नंतर “कर्करोग मे योग” या विषयावरील माहितीपट दाखविण्यात आला या प्रसंगी कैवल्यधाम संस्थेतील प्रथम टप्प्यावरील कर्करोगावर योगाद्वारे मात केलेल्या बहुकुशल कामगार श्रीमती सुनीता फतरोड हिच्या जीवनावरील माहितीपट दाखवून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तिचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षामध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांची, व संस्थेस भेटी दिलेल्या मान्यवरांची चित्रफितीद्वारे माहिती संक्षिप्त स्वरूपात दाखविण्यात आली .
कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभारप्रदर्शन शनाया वात्सायन यांनी केले. “ओम पूर्ण मद” शांती पाठाने उद्घाटन समारंभाची सांगता करण्यात आली.