लोणावळ्यातील या ऐतिहासिक खड्डयाचे रहस्य काय?

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ईश्वरलाल अँन्ड सन्स या दुकानासमोरील रस्त्यावर एक खड्डा खणला आहे. मागील एक महिन्याहून अधिक कालावधी झाला तरी हा खड्डा बुजविण्यात आलेला नाही किंवा त्याठिकाणी कोणतेही काम करण्यात आलेले नाही. असा हा ऐतिहासिक खड्डा न बुजविण्यामागील रहस्य नेमके काय आहे असा प्रश्न लोणावळाकर नागरिकांना पडला आहे.
मागील महिन्यात जैन मंदिराचा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा झाला. यावेळी या भागात भुयारी गटाराचे काम सुरु होते. जैन धर्माचे गुरु व मिरवणुका या रस्त्यावरुन जाणार असल्याने प्रशासनाकडे वेळेवळी विविध संघटनांनी विनंती केल्यानंतर सदर भागातील काम उरकते घेऊन तात्पुरता रस्ता बनविला मात्र हा खड्डा आज देखील आहे तेथेच दिमाखात उभा आहे. येत्या 10 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. लोणावळा शहर व पंचक्रोशीतील शेकडो शिवज्योती या चौकात महाराजांना वंदन करण्यासाठी येत असतात. त्यासर्वांना या ऐतिहासिक खड्डयाचा त्रास होणार आहे. आता देखील या रस्त्यावरुन जाणारे नागरिक व व्यावसायिक यांना असुविधेचा सामना करावा लागत असल्याने लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने सदरचा ऐतिहासिक खड्डा तात्काळ बुजवत नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा या खड्डयाने कोणाचा बळी घेतल्यास त्यास केवळ लोणावळा नगरपरिषद प्रशासन जबाबदार असणार आहे.