Breaking news

Ekvira Devi Yatra 2024 : हजारो भाविकांच्या उपस्थितीत कार्ला गडावर रंगला आई एकविरा देवीचा मानाचा पालखी मिरवणूक सोहळा

लोणावळा : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कोळी, आग्री, सिकेपी, सोनार अशा विविध समाजाचा कुलस्वामिनी असलेल्या लोणावळ्या जवळील कार्ला गडावरील आई एकविरा देवीचा मानाचा पालखी सोहळा सोमवारी (15 एप्रिल) सायंकाळी 5.30 वाजता कार्ला गडावर उत्साहपूर्ण वातावरणार पार पडला. देवीचे मंदीर फुलांची आकर्षक सजावट करून सजवण्यात आले होते तसेच गाभारा देखील फुलांनी सजविण्यात आला होता. यावर्षी दरवर्षी च्या एक तास अगोदर पालखी काढण्यात आली होती.

        आई माऊलीचा उदो… उदो…, आई आयलो… च्या नामघोषांनी अवघा कार्ला गड दुमदुमला होता. पालखी मिरवणूक सोहळा शांततेमध्ये पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन व श्री. एकविरा देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळ यांनी नियोजन केले होते. कडक पोलीस बंदोबस्तात पालखीचे मानकरी असलेल्या चौल, आग्राव व ठाणेकर यांनी पालखीला खांदा लावत आई राजा उदो उदो चा गजर केला. गडावर पारंपारिक वाद्यांच्या गजरात पालखी सोहळा पार पडला. हजारोंच्या संख्येने भाविक हा सोहळा पाहण्यासाठी गडावर आले होते.            

      महाराष्ट्रातील जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या कुलस्वामिनी आई एकविरा देवीची चैत्री यात्रा व पालखी सोहळा पाहण्यासाठी यावर्षी प्रचंड गर्दी झाली होती. शाळांच्या परीक्षा संपलेल्या असल्याने गर्दीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. देवघर येथे माहेरघरात देखील रविवारी काळ भैरवनाथ महाराजांचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोकण भागातून शेकडो पायी पालख्या गडावर आल्या होत्या. काही दिवस व कित्येक तास उन्हा तन्हात पायी प्रवास करत भाविक कार्ल्यात दाखल झाले होते. मोठ्या श्रद्धेने व मनोभावे भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. अनेकांनी नवस फेडले. यात्रेकरिता कार्ला व वेहेरगावचा परिसर सजला होता. हारफुले, प्रसाद, कूंकू व खेळणी विक्रेते यांची दुकाने साहित्यांनी सजली होती. येणार्‍या भाविकांना त्रास होऊ नये याकरिता पुणे ग्रामीण पोलीस दल व लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन च्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

 यात्रेचे नियोजन

 यात्रा काळात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना योग्य व सुलभ प्रकारे दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी लोणावळा उपविभागीय पोलीस आधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक, लोणावळा ग्रामीण पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ, श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मारुती देशमुख, संजय गोविलकर, नवनाथ देशमुख, सागर देवकर, विकास पडवळ, महेंद्र देशमुख, सरपंच व विश्वस्त वर्षा मावकर, पोलीस पाटील अनिल पडवळ, वन विभाग, भारतीय पुरातत्व विभाग यांच्यासह विविध शासकीय अधिकाऱ्यांनी यात्रेचे नियोजन केले गेले आहे. 350 पोलीस बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले होते. मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख व महसूल अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.





इतर बातम्या

महागाई व बेरोजगारीने त्रस्त झालेले सर्वसामान्य नागरिक आपल्याला मतदान करणार नाही याची खात्री पटल्याने भाजपाने राज्यात सर्वत्र फोडाफोडीचे राजकारण केले - निखिल कवीश्वर