Breaking news

Maval Loksabha Election | मावळ लोकसभेसाठी 33 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 2 जणांची माघार

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या (29 एप्रिल) अखेरच्या दिवशी मावळ लोकसभा मतदारसंघातून अपक्ष भाऊसाहेब आडागळे व धर्मपाल तंतरपाळे या दोन उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे या मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, 33 उमेदवार रिंगणात असणार आहेत. असे असले तरी मुख्य लढत ही महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे व महायुतीचे श्रीरंग बारणे यांच्यातच होणार आहे.

        मावळ लोकसभा मतदारसंघातून 38 उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी छाननीमध्ये तीन अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाले, तर 35 उमेदवार पात्र ठरले होते. अर्ज माघारी घेण्याची सोमवारी अंतिम मुदत होती. त्यामध्ये दोन उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात 33 उमेदवार राहिले आहेत. 

       मावळ लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे मशाल हे चिन्ह घेऊन या निवडणुकीमध्ये उतरले असून मागील काही दिवसांपासून त्यांचा जोरदार प्रचार देखील सुरू आहे. महायुतीच्या वतीने शिवसेना शिंदे पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली असून धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन ते या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहेत. वंचित बहुजन पार्टीच्या वतीने माधवी जोशी यांना रिक्षा हे निवडणूक चिन्ह मिळाले असून त्यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराला सुरुवात केली आहे. आज अर्ज माघारी नंतर व चिन्ह वाटपानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी व महायुती यांच्याकडून प्रचाराचे रणधुमाळी सुरू झाली असून दोघांचेही कार्यकर्ते घरोघरी जाऊन निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करत आहेत.

इतर बातम्या