Breaking news

Karla News : पुराचा धोका टाळण्यासाठी कार्ला परिसरातील नदी, नाले सफाई तात्काळ करून घ्या - तहसीलदार मावळ

लोणावळा : कार्ला, मळवली परिसरात मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पुर आला होता. इंद्रायणी नदीपात्रात जमा झालेला गाळ, जलपर्णी व बेशरमीच्या झाडांमुळे पाण्याचा प्रवाह बाधित होता व पाणी नदीपात्राबाहेर जागा मिळेल त्या भागात पसरते. यावर्षी पुन्हा पुराची स्थिती निर्माण होऊ नये याकरिता तात्काळ नदी, नाले सफाई करून गाळ व जलपर्णी काढून टाका असा सूचना वजा आदेश मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी कार्ला परिसरातील कार्ला, पाटण, वाकसई, औंढे खु., खडकाळे, ताजे आदी ग्रामपंचायतींना दिला आहे. कार्ला परिसरात इंद्रायणी नदीचे पात्र उथळ झाले असल्याने दरवर्षी याभागात पुराचा धोका निर्माण होत असल्याने तात्काळ उपाययोजना करा या मागणीसाठी श्री एकविरा कृती समितीच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात आले होते. यानंतर जिल्हाधिकारी पुणे यांनी देखील कार्ला परिसरातील नदी नाल्यांची पाहणी केली होती. 

    मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी 4 मे रोजी वडगाव येथे सर्व विभागांच्या बैठका घेण्यात आल्या. यामध्ये वरील सूचना दिल्या आहेत. पावसाळा तोंडावर आला असल्याने तात्काळ नदी नाले सफाई करत अहवाल सादर करा असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. मागील वर्षी कार्ला, मळवली परिसराला पूराचा मोठा विळखा पडल्याने अनेक सदनिका व सोसायट्या पाण्याखाली गेल्या होत्या. यावर्षी तशी परिस्थिती पुन्हा येऊ नये याकरिता एकविरा कृती समिती व ग्रामपंचायतींच्या मागणीनंतर सदर आदेश देण्यात आले आहे.

इतर बातम्या