Breaking news

लोणावळ्यात लाॅकडाऊनमध्ये लग्न करणे पडलं महागात; 57 हजारांचा झाला दंड

लोणावळा : कोरोनाची साखळी रोखण्यासाठी ब्रेक द चैन मध्ये शासनाने कडक निर्बंध घातलेले असताना या नियमांचे उल्लंघन करत लोणावळ्यात जास्त लोकं जमवत लग्न करणे मुंबईतील एक कुटुंबांला चांगलेच महागात पडलं. लोणावळा नगरपरिषदेने लग्नासाठी जास्त गर्दी जमविल्याप्रकरणी या व्यक्तीला 50 हजार रुपयांचा दंड केला असून लोणावळा शहर पोलिसांनी विविध कलमान्वये कारवाई करत 7 हजारांचा दंड केला आहे. सोमवारी (26 एप्रिल) रोजी ही कारवाई करण्यात आली.

    महाराष्ट्रात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 पर्यत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये लग्न सोहळे 2 तासात 25 नागरिकांच्या उपस्थितीमध्ये करण्याचे आदेश दिले आहेत व आदेशाचे पालन न झाल्यास 50 हजार रुपये दंड व लग्नाचे ठिकाण कोविड 19 संसर्गाची अधिसूचना अस्तित्वात आहे तोपर्यंत बंद ठेवण्याचे म्हंटले आहे. सोमवारी गोल्ड व्हॅली तुंगार्ली येथे एका बंगल्यात नियमांचे उल्लंघन करत लग्नसोहळा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा नगरपरिषदेच्या पथकाने व लोणावळा शहर पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन ही कारवाई केली.

    लोणावळा शहरातील कोरोना साखळी तोडण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेकडून तीन दिवसांचा कडक लाॅकडाऊन जाहिर केला होता. लाॅकडाऊनच्या पहिक्याच दिवशी सर्वत्र बंद असताना एका बंगल्यात मात्र लग्नसोहळा सुरू असल्याने ही कारवाई करण्यात आली. लोणावळा शहरात आज विनाकारण फिरणार्‍या 50 जणांची चेकपोस्टवर कोरोना अँन्टीजन तपासणी करण्यात आली. यामध्ये पाॅझिटिव्ह सापडलेल्या 10 जणांची कोविड सेंटरला रवानगी करण्यात आली असल्याचे नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सांगितले.

इतर बातम्या