Breaking news

Expressway Accident | मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर तीन वाहनांचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी

खोपोली : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास किलोमीटर 38/200 जवळ तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर खोपोली व एमजीएम रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

      मिळालेल्या माहितीनुसार आज शुक्रवारी (10 मे) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने निघालेला ट्रक क्रमांक (KA - 56 - 3277) किमी 38/200 जवळ आला असताना ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटून ट्रक पुढे चालणाऱ्या कोंबडी वाहून  नेणाऱ्या टेम्पो क्रमांक MH-03-CP- 2428 व ओमनी क्र. MH -11- Y- 7832 या वाहनांना ट्रकची जोरात धडक दिली.

     या भीषण अपघातात ओमनी कार मधील 2 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे तर 3 जण जखमी झाले आहेत. कोंबड्या वाहून नेणाऱ्या टेम्पो मधील 2 जण गंभीर तर 2 जण किरकोळ जखमी आहेत. ट्रक मधील 1 जण मयत व 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी एमजीएम हाॅस्पीटल पनवेल आणि खोपोली नगरपालिका रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. 

     अपघाताची माहिती समजताच बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी कडील देवदूत टिम, आयआरबी पेट्रोलींग टिम, मृत्युंजय दूत, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, लोकमान्य हॉस्पिटल ॲम्बुलन्स सेवा, महाराष्ट्र शासनाची 108 ॲम्बुलन्स सेवा यांनी मदतकार्य केले. अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती मदत यंत्रणेने व पोलीस यंत्रणा यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करत काही वेळानंतर ही वाहतूक सुरळीत सुरू केली. या अपघाताचा अधिक तपास खोपोली पोलीस करत आहेत.



इतर बातम्या