Breaking news

लोणावळा शहरात उद्यापासून विकेंड लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी होणार; अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने राहणार बंद

लोणावळा : लोणावळा शहरातील कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी व शासनाच्या आदेशानुसार शनिवार व रविवारी (विकेंड) लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद राहतील. या नियमांचे उल्लंघन केल्यास व्यावसायकांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच आठवड्याचे सर्व दिवस सायंकाळी 4 नंतर दुकाने बंद न झाल्यास त्यांच्यावर साथरोग नियमांनुसार कारवाई केली जाणार आहे. जमावबंदी आदेशाची देखील शहरात कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.

    लोणावळा नगरपरिषदेत याबाबतची महत्वाची बैठक आज पार पडली. याबैठकीला नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार, उपमुख्याधिकारी भगवान खाडे, माजी उपनगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक श्रीधर पुजारी, नगरसेवक भरत हारपुडे, बाळासाहेब जाधव, विशाल पाडाळे, लोणावळा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप गुप्ता, चिक्की उद्योजक व व्यापारी मंगेश आगरवाल व मुकेश परमार, भाजी मंडई असोसिएशनचे अध्यक्ष राजु बोराटी, प्रशांत इंगवले, पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल विकारी हे उपस्थित होते.

   यावेळी बोलताना मुख्याधिकारी सोमनाथ जाधव व पोलीस निरीक्षक दिलीप पवार म्हणाले जिल्हाधिकारी पुणे यांनी लोणावळा परिसरातील पर्यटनस्थळांवर जमावबंदी आदेश लागू केले आहेत. तसेच मागील काही दिवसांपासून पर्यटकांची शनिवार व रविवारी लोणावळ्यात होणारी गर्दी पाहता, लोणावळा शहराला हाॅट स्पाॅट होण्यापासून वाचवायचे असेल तर शासनाच्या आदेशानुसार विकेंड लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तसेच इतर दिवशी देखील सायंकाळी 4 नंतर दुकाने ही बंद व्हायलाच हवीत. सायंकाळी 4 नंतर दुकाने उघडी दिसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. सर्व व्यापारी संघटनांनी देखील शासनाच्या आदेशाचे पालन करण्याची ग्वाही यावेळी दिली. तसेच नियमांचा भंग करणार्‍या अस्थापनेवर कारवाई झाल्यास त्याला व्यापारी संघटना जबाबदार असणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 

    लोणावळा शहर हे पर्यटनाचे ठिकाण असल्याने याठिकाणी पर्यटक हे येणारच यात कोणाचेही दुमत नाही. मात्र प्रत्येकाने स्वंयशिस्त पाळत नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. व्यावसायकांनी देखील नियमांचे पालन करून व्यावसाय केल्यास कोरोनाचे संक्रमण होणार नाही. याकरिता व्यापारी वर्गाकडून प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका याबैठकीत घेण्यात आली. तसेच दुकानांमध्ये देखील पाच पेक्षा अधिक लोक एकत्र येणार नाही याची दक्षता घेऊ असे प्रतिनिधींनी सांगितले. अतिशय सकारात्मक पद्घतीने ही बैठक पार पडली.

     पुणे जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेश व शासनाचे विकेंड लाॅकडाऊनचे आदेश यांची शहरात कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून याकरिता लोणावळा शहर पोलीस ठाणे व लोणावळा नगरपरिषद यांच्या टिम तयार करण्यात आल्या आहेत.

व्यावसायकांचे लसीकरण करा

लोणावळा शहरातील व्यावसायकांसाठी एक दिवसाचा कॅम्प लावत तपासणी मोहिमेप्रमाणे कोरोना लसीकरण करावे अशी मागणी लोणावळा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गुप्ता, भाजी मंडई असोसिएशनचे अध्यक्ष राजु बोराटी, मुकेश परमार आदींनी मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्याकडे केली आहे.

इतर बातम्या