Breaking news

Karla News l कार्ला मळवली रस्त्यावरील कार्ला हद्दीतील खड्ड्यांच्या विरोधात आमरण उपोषणाचा इशारा

लोणावळा : कार्ला ते मळवली दरम्यानच्या मुख्य रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. कार्ला हद्दीमध्ये रस्त्यावर गेल्या अनेक वर्षापासून गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे त्यामुळे या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत त्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत अपघात देखील घडत आहेत मागील काही वर्षांपासून हा खेळ सुरू असताना त्याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेली नाही. पावसाळा तोंडावर आला असल्याने तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाने हे खड्डे दुरुस्त करत रस्ता वाहतुकीस योग्य करावा अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधामध्ये उपोषण करण्याचा इशारा कार्ला ग्रामपंचायतचे माजी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब हुलावळे यांनी दिला आहे.

    याविषयी बोलताना भाऊसाहेब हुलावळे म्हणाले, कार्ला मळवली रस्त्यावर कार्ला हद्दीत रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी खड्डय़ात पाणी साचत आहे. आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक, कार्ला, भाजे लेणी, लोहगड, विसापूर किल्ले बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना व स्थानिक परिसरातील तीस गावातील नागरीकांना दुर्गधी सह छोट्यामोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. त्या ठिकाणाहून चालताना जीव मुठीत धरून चालत असताना गटाराचे पाणी अंगावर तर येणार नाही याची काळजी घेत जावे लागते. रोज हजारो वाहने या ठिकाणाहून ये जा करतात वाहनचालकांना कसरत करत वाहन चालवावे लागते.

      पावसाळ्यात या रस्त्याने स्थानिकां बरोबर हजारो पर्यटकांची वर्दळ असते, जर या ठिकाणचे खड्डे आणि गटाराच्या पाण्याची योग्य व्यवस्था केली नाहीतर पावसाळ्यात स्थानिकांबरोबर पर्यटकांच्या सुरक्षेतेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एवढी जटील समस्या असताना संबंधित यंत्रणेला नागरीकांची चालली ससेहोलपट दिसत नाही याचा खेद वाटतो आणि म्हणुनच ही समस्या कायम स्वरुपी आठ दिवसात सोडवली नाही तर याच जागेवर ही समस्या सुटत नाही तोपर्यंत अमरण उपोषण करणार आहे.

इतर बातम्या