Breaking news

लोणावळा दुय्यम निबंधक कार्यालयात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा; गर्दी देतीये कोरोनाला निमंत्रण

लोणावळा : लोणावळा दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी होत असलेली गर्दी कोरोनाला निमंत्रक ठरत आहे. असे असताना याठिकाणी कोणतेही नियोजन होताना दिसत नसल्याने दस्त नोंदणीसाठी येणारे नागरिक संताप व्यक्त करत आहे.

    लाखो रुपयांचे उत्पन्न मिळून देणारे लोणावळा शहरातील दुय्यम निबंधक कार्यालय हे मागील अनेक वर्षापासून असुविधांच्या गर्तेत आडकेले आहे. वारंवार मागणी करून देखील या कार्यालयाचे स्थलांतरण होत नसल्याने नोंदणीसाठी येणार्‍या नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या कोरोना साथरोगामुळे सर्वत्र मास्क व फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना शासनस्तरावरून दिल्या जात असताना, या कार्यालयात मात्र फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडालेला पहायला मिळत आहे. दस्त नोंदणीचे कोणतेही नियोजन नसल्याने टोकन घेण्यासाठी व दस्त नोंदणीसाठी याठिकाणी झुंबड उडत आहे. त्यातच सर्व्हर कनेक्टिव्हिटी समस्या कायम असल्याने सकाळी दस्त नोंदणीसाठी नंबर लावला की दस्त नोंद होण्यासाठी सायंकाळ होते तर कधी कधी दुसरा दिवस येतो अशी मते काही वकिलांनी व्यक्त केली आहेत. काही जणांनी याबाबत सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी देखील केल्या आहेत.

    याठिकाणी होणार्‍या गर्दीला जशी येथील शासकीय यंत्रणा कारणीभूत आहे तशीच काही प्रमाणात दस्त नोंदणीसाठी येणारे नागरिक व वकिल मंडळी देखील कारणीभूत आहेत. सकाळपासून कार्यालयात गर्दी करत ही मंडळी टोकन मिळविण्याचा प्रयत्न करत असतात, कारण नसताना काहीजण कार्यालयात घुटमळतात. खरंतर सदर कार्यालय इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर आहे. पावसामुळे येथे बसण्याची सुविधा नाही, जे काही थोडेफार बाकडे व खुर्च्या आहेत ते पावसाने ओले झालेले असतात. लिफ्ट सुविधा नसल्याने अपंग व्यक्तीना याठिकाणी अक्षरशः खुर्चीमध्ये उचलून आणावे लागते. स्वच्छतागृहाची सोय नाही. अतिशय लहान जागेत या कार्यालयाचे कामकाज वर्षानुवर्ष सुरू आहे. दस्तांचे व रजिस्टर ढिग कार्यालयात लागले आहेत. अतिशय महत्वाची ही कागदपत्रे असल्याने त्यांची जपणूक करण्यासाठी योग्य नियोजन असायला हवे. सदर इमारतीच्या ठिकाणी वाहनतळाची मुबलक सोय नसल्याने वाहने रस्त्यात कोठेही उभी केली जातात. यासर्व बाबींचा विचार करून सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाने लोणावळ्यात सुसज्ज जागेत हे कार्यालय हालविणे ही काळाची गरज बनली आहे. 

    कोरोना काळात ह्या कार्यालयात होत असलेली गर्दी रोखण्यासाठी येथील दुय्यम निबंधक व वरिष्ठ अधिकारी यांनी नियोजन करणे गरजेचे आहे. याविषयी बोलताना येथील प्रभारी दुय्यम निबंधक सिमा राजापुर म्हणाल्या गर्दी टाळण्यासाठी आम्ही वारंवार सुचना देतो मात्र नागरिक ऐकत नाहीत, याकरिता आता वरिष्ठांशी चर्चा करून पोलीस स्टेशन मार्फत एक कर्मचारी येथे मिळेल का याबाबत विचार सुरू आहे. नागरिकांशी थेट संपर्क टळावा याकरिता काऊंटरला प्लास्टिक विंन्डो लावण्यात आली आहे. तसेच कामाचा निपटारा करण्यासाठी संगणक वाढविण्यात आला आहे. नागरिकांनी देखील कार्यालयात अनावश्यक गर्दी न करता टोकन निहाय दस्त नोंदणीसाठी यावे, तसेच सर्वांनी कटाक्षांने मास्कचा वापर करावा असे आवाहन सिमा राजापुर यांनी केले आहे.

इतर बातम्या