Lonavala News l फी भरण्यास असमर्थ असलेल्या पालकाला मनसेचा दिलासा; 3 अपत्यांचे दाखले मिळवून देण्यात यश

लोणावळा : महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर यांच्या मनसे स्टाईल दणक्यानंतर एका खाजगी शाळेने फी भरण्यास असमर्थ असलेल्या पालकाच्या तीन मुलांचे शाळेचे दाखले व निकाल पत्र न देण्याची भूमिका मागे घेत दाखले व निकालपत्र दिली आहेत.
लोणावळा शहरातील कोणतीही शाळा फी साठी मुलांची अडवणूक करत असेल व त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवत असेल तर अशा मुलांनी व त्यांच्या पालकांनी मनसेची संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराच्या वतीने मागील आठवड्यात करण्यात आले होते. त्यानुसार, कुसगाव बुद्रुक येथील जगन्नाथ कांबळे यांनी मनसेचे शहराध्यक्ष निखिल भोसले यांच्याशी संपर्क साधत आपली व्यथा मांडली. लोणावळ्यातील एका खाजगी शाळेने त्यांचे तीनही अपत्य – वैभवी (10वी), साक्षी (6वी) आणि आदित्य (4थी) यांचे शाळा सोडण्याचे दाखले व गुणपत्रिका थकित फी 53 हजार रुपये असल्याने रोखून ठेवले होते.
कांबळे यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याचे मनसेने प्रत्यक्ष पाहणीद्वारे पडताळले. विशेष म्हणजे सदर शाळेला सध्या शैक्षणिक परवाना नसल्याने ती बंदही करण्यात आलेली आहे. तरीदेखील दाखले न दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणे अशक्य झाले होते. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष निखिल भोसले व प्रवक्ते अमित भोसले यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाळेवर धडक दिली आणि विद्यार्थ्यांचे सर्व दाखले मिळवून दिले. मनसेने स्पष्ट इशारा दिला आहे की, फी थकबाकीच्या कारणावरून कोणतीही शाळा विद्यार्थ्यांचे मूलभूत शिक्षण हक्क नाकारू शकत नाही, आणि अशा प्रकारे अडवणूक करणाऱ्या शाळांविरुद्ध मनसे ठामपणे उभी राहील. मात्र पालकांची परिस्थिती खरच नाजूक आहे याची खात्री करूनच निर्णय घेतला जाईल. या कारवाई वेळी मनसेचे संदीप बोभाटे, सुनील सोनवणे, सुभाष रेड्डी, जुबेर मुल्ला, आकाश सावंत, कैवल्य जोशी, नरेश महामुनी आणि इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.