Breaking news

व्ही. पी. एस. प्राथमिक विद्यालयात पंढरीच्या वारीचा आगळा वेगळा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

लोणावळा : विद्या प्रसारिणी सभा संस्थेच्या व्ही. पी. एस. प्राथमिक विद्यालयात इयत्ता 1 ली ते 4 थीच्या विद्यार्थ्यांसाठी पंढरीच्या वारीचा आगळा वेगळा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून संपूर्ण परिसर हरिनामाने भक्तिमय केला.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही. पी. एस. हायस्कूलचे प्राचार्य सुहास विसाळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्ही. पी. एस. इंग्लिश टीचिंग स्कूलचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला जाधव यांनी केले. या सोहळ्यात शाळेच्या शिक्षिका मनिषा जरग यांनी वारीचे महत्त्व व मराठी संस्कृतीचे मूल्य कथारूपी भाषेत विद्यार्थ्यांना समजावले. विद्यार्थ्यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत एकनाथ, संत जनाबाई, संत मुक्ताबाई अशा संतांच्या वेशभूषा साकारत विविध अभंग सादर केले.

     सोहळ्यात वृक्षसंवर्धनाचा संदेशही देण्यात आला. "ज्ञानोबा-तुकाराम" च्या जयघोषात रिंगण सोहळा रंगला. टाळकरी, तुळशी वृंदावन घेऊन चालणारे वारकरी, फुगडी खेळणारी बालवारकरी या साऱ्यांनी शाळेच्या परिसरात पंढरीच्या वारीचे सजीव दर्शन घडवले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह विजय भुरके यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनिषा जरग, सुनिता वरे, कविता पंगुडवाले, संगीता पाटील, प्राजक्ता दिवसे, श्रीमती स्वप्नाराणी भालेराव, संजय भालचिंम, प्रकाश पाटील, हनुमंत शिंदे, अमित रसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती जयश्री बागलकोटे यांनीही मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन सुनिता वरे यांनी केले.

इतर बातम्या