Breaking news

Talegaon News : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मातोश्रींनी महिलांना सांगितले यशस्वी होण्याचे रहस्य

तळेगाव दाभाडे (विशेष प्रतिनिधी) : आयुष्यातील गरीबी, प्रेमविवाहानंतरचा जीवघेणा संघर्ष, लढण्याची जिद्द, कष्ट आणि वडिलांनी दिलेल्या अपार आत्मविश्वासाच्या बळावर माता म्हणून तीनही मुलींना कर्तृत्ववान केलेल्या आपल्या आयुष्यातील कटूगोड आठवणींना मनमोकळेपणाने सांगत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मातोश्री शिबानी बागची यांनी मंगळवारी (14 मार्च) तळेगाव दाभाडे येथील ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतील उद्यमी प्रशिक्षणार्थी महिलांना यशस्वी होण्याचे रहस्य सांगितले. आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्षाचे औचित्य साधून महिलांसाठी संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या फास्ट फूड स्टॉल उद्यमी मोफत प्रशिक्षण सत्राच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रेस फौंडेशनचे अध्यक्ष अमिन खान होते.

      संस्था संचालक प्रवीण बनकर म्हणाले, की श्री धर्मशाला मंजुनाथेश्वरा एज्युकेशनल ट्रस्ट, सिंडिकेट बॅंक आणि कॅनरा बॅंक संचलित ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था पुणे (रूडसेट) चे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. गेल्या 25 वर्षात राज्यातील 12 हजार 500 ग्रामीण युवक व युवतींना स्वयंरोजगाराच्या विविध अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. त्यापैकी 8 हजार 458 जणांनी स्वत:चे उद्योग व्यवसाय उभारलेत. यावेळी पत्रकार अमिन खान म्हणाले, की महिलांमध्ये आव्हाने पेलण्याची निसर्गदत्त शक्ती आहे. पुरूषांच्या तुलनेत आपण अधिक सक्षम असल्याची जाणीव करून घेण्याचा प्रयत्न महिलांनी केल्यास त्या कोणतेही काम सरस करू शकतील. मात्र यश हे केवळ स्वत:पुरते मर्यादित न ठेवता सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून उद्यमींनी इतरांना मदत करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन पत्रकार खान यांनी यावेळी केले.

     मुंबईतील स्नेहा (SNEHA) फौंडेशनच्या प्रमुख शिबानी बागची यांनी त्यांची कन्या स्मृती इराणीसह दोन्ही मुलींच्या पालनपोषणापासून ते यशस्वी होण्यापर्यंतच्या प्रवासातील कटूगोड आठवणी सांगितल्या. त्या पुढे म्हणाल्या, की उद्यमी होताना महिलांनी धृढनिश्चय, आत्मविश्वास आणि आपल्यातील क्षमतांचा पूरेपूर वापर केला पाहिजे. संकटे ही तुमच्या मानसिक आंदोलनांची परीक्षा असते. त्याला आश्वासकपणे सामोरे गेलात, तर यश निश्चित आहे. पाहुण्यांच्या हस्ते उद्यमी प्रशिक्षण यशस्वीपणे उत्तीर्ण केलेल्या राज्यातील 56 महिलांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. प्रशिक्षिका सुनंदा बनुबाकोडे व प्राची कुलकर्णी यांना सन्मानीत करण्यात आले. यावेळी प्रशिक्षक संदीप पाटील व हरिश बावचे, सहायक दिनेश नीळकंठ उपस्थित होते. कोकिला शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. नीळकंठ यांनी आभार मानले.

...आणि मुस्कानच्या चेह-यावर ओघळले आनंदाश्रू !

शिबानी यांच्या आयुष्यातील कटू प्रसंग ऐकताना आपल्याही आयुष्यात असेच घडत असल्याने प्रशिक्षणार्थी मुस्कान पठाण भावनाशील झाली. तिचे ओघळणारे अश्रू पाहताच शिबानी यांनी तिला व्यासपीठावर बोलवून मायेचे आलिंगन देत धीर दिला. “तू लढ, मी तुझ्यासोबत आहे”, असे त्यांचे बोल ऐकताच मुस्कानच्या चेह-यावर आनंदाचे अश्रू ओघळू लागले.

इतर बातम्या