Lonavala Breaking News : लोणावळ्यात वार्यामुळे दोन ठिकाणी झाडे पडली; तीन चारचाकी वाहनांचे नुकसान

लोणावळा : लोणावळा शहरात आज दुपारी अचानक काळे ढग दाटून येऊन झालेला पाऊस व त्यापूर्वी आलेला सोसाट्याचा वारा यामुळे लोणावळा बस स्थानक व यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुल या ठिकाणी चंद्रिकेची झाडे पडून तीन चार चाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आज सकाळपासूनच लोणावळ्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सकाळच्या सत्रात दोन वेळा पावसाच्या हलक्या सरी येऊन गेल्या. त्यानंतर निरभ्र झालेल्या आकाशात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक काळ्या ढगांची दाटी झाली व सोसाट्याचा वारा सुरू होऊन पावसाला सुरुवात झाली. या वाऱ्यामुळे लोणावळा बसस्थानकाजवळ चंद्रिका प्रकाराचे एक झाड कारवर पडले तर लोणावळा बाजार भागातील व्यापारी संकुलाजवळ त्याच प्रजातीचे दुसरे झाड पडून दोन चार चाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. बस स्थानकाजवळ झाड पडल्याने एसटी बस बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला होता. झाडे पडल्याची माहिती समजल्यानंतर लोणावळा नगर परिषदेच्या वृक्ष विभागाच्या वतीने सदरची झाडे कापत बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आहेत.
सध्या सर्वत्र मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली असल्याने वाऱ्यामुळे झाडे पडणे तसेच वीज पडणे असे प्रकार होण्याची शक्यता जास्त असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, शक्यतो झाडांखाली उभे राहू नये.