मोठी बातमी l तिकोना किल्ल्यावर अडकलेल्या तीन पर्यटकांची ‘शिवदुर्ग’कडून थरारक सुटका; दगडफेकीनंतरही बचावकार्य फत्ते!
लोणावळा : मावळ तालुक्यातील ऐतिहासिक तिकोना किल्ल्यावर काल (2 ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास मार्ग भरकटल्यामुळे अडकून पडलेल्या तीन पर्यटकांची ‘शिवदुर्ग रेस्क्यू टीम’ने अत्यंत कौशल्याने आणि धैर्याने सुखरूप सुटका केली आहे. अंधार आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत बचाव पथकाने राबवलेल्या या थरारक मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बबुल जितेंद्र काजडे, जितेन मारखा आणि बाबू मारदेसई हे तीन पर्यटक तिकोना किल्ल्यावर फिरण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत वीरेंद्र मारगव, मुकेश आणि राकेश जांभेकर हेही होते. काल रात्रीच्या सुमारास यातील तीन जण किल्ल्यावर वाट चुकून बिकट ठिकाणी अडकल्याची माहिती शिवदुर्ग रेस्क्यू टीमला मिळाली.
घटनेचे गांभीर्य ओळखून शिवदुर्ग रेस्क्यू टीमने तातडीने तिकोना किल्ल्याकडे धाव घेत बचावकार्य सुरू केले. शोधमोहीम सुरू असतानाच सुरुवातीला दोन पर्यटक पथकाच्या हाती लागले. मात्र, तिसरा पर्यटक अत्यंत दुर्गम आणि आतील भागात निघून गेल्याने त्याचा शोध घेणे पथकासाठी मोठे आव्हान ठरत होते.
अंधारात त्याच्या आवाजाचा मागोवा घेत बचाव पथक त्याच्या दिशेने पुढे जात असताना, घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या त्या पर्यटकाकडून पथकाच्या दिशेनेच दगडफेक केली जात होती. अशा कठीण आणि धोकेदायक परिस्थितीतही शिवदुर्गच्या सदस्यांनी अत्यंत संयम, चातुर्य आणि धैर्याने मोहीम सुरूच ठेवली. अखेर पर्यटकाला शांत करत त्याचा शोध घेण्यात पथकाला यश आले.
या अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक मोहिमेत शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे सुजित मोहळ, रमेश कुंभार आणि गणेश सणस यांनी मोलाचे योगदान दिले. बचाव पथकाच्या अथक प्रयत्नांमुळे आणि योग्य वेळेत मिळालेल्या मदतीमुळे तिन्ही पर्यटकांना सुखरूपपणे किल्ल्यावरून खाली आणण्यात यश आले. शिवदुर्ग टीमच्या या धाडसी कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
















