Breaking news

Lonavala Big News : आठ दिवसात कारवाई करण्याच्या आश्वासनानंतर भूशी सर्वे नं. 54/2 मधील रहिवाशांचे तीन दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित

लोणावळा : घराकडे जाणारे दोन्ही रस्ते दोन वेगवेगळ्या ठिकाणी बंद करण्यात आल्याने व वारंवार पाठ पुरावा करून देखील कोणीही दखल घेत नसल्याने अखेर भुशी येथील सर्वे. नं. 54/2 मधील रहिवाश्यांनी 7 फेब्रुवारी पासून लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमरण उपोषण सुरू केले होते. आज तिसऱ्या दिवशी मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी येत्या आठ दिवसात उचित कारवाई करण्याचे तसेच रेल्वेची मालकी असलेला रस्ता भाडे तत्वावर घेऊन तो नागरिकांसाठी खुला करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदरचे आमरण उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. आज दुपारी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेत त्यांच्या मागण्या समजावून घेतल्या, नंतर मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करत मार्ग काढण्याची मागणी केली. यानंतर मुख्याधिकारी यांच्या समवेत उपोषणकर्ते यांची बैठक झाली. मा. उच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीची उपोषणकर्ते यांनी भेट घेत, माहिती दिली होती. त्यांनी देखील याबाबत मुख्याधिकारी यांना कारवाई करण्याबाबत सूचित केले होते.

       यामध्ये माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विलास बडेकर, भाजपा अध्यक्ष अरुण लाड, भाजपा नेते आशिष बुटाला, माजी नगरसेवक ललित सिसोदिया, अशोक ढाकोळ, उपोषणकर्ते विदुला वर्तक व अन्य सहकारी उपस्थित होते. 54/2 कडे जाणाऱ्या एका रस्त्यावर न्यायालयाचा स्टे असल्याने तो उठे पर्यंत कारवाई करता येणार नाही मात्र सदरचा स्टे उठविण्यासाठी लोणावळा नगरपरिषद प्रयत्न करेल, लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली जाईल असे साबळे यांनी सांगितले. तसेच दुसरा रस्ता असलेली जागा रेल्वे प्रशासनाची असल्याने सदरची जागा भाडे तत्वावर घेऊन तो रस्ता नागरिकांसाठी खुला करण्याचे आश्वासन दिले. याकरिता नगरपरिषद नगररचना विभागाचे वरिष्ठ अधिकारी व उपोषणकर्ते यांचा एक प्रतिनिधी रेल्वे व्यवस्थापक यांची भेट घेऊन आवश्यक तो पत्र व्यवहार व पाठपुरावा करेल, युद्ध पातळीवर हे काम करत नागरिकांना रस्ता उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्याधिकारी साबळे यांनी दिले. यामुळे समाधान झाल्याने उपोषणकर्ते यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. मुख्याधिकारी अशोक साबळे, सुरेखा जाधव, सूर्यकांत वाघमारे, माजी उपनगराध्यक्ष भरत हारपुडे, विलास बडेकर यांनी सरबत पाजत उपोषण सोडवले.

     उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी लोणावळा शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व जागरूक नागरिक यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेत त्यांच्या मागण्या समजावून घेतल्या. त्यानंतर मुख्याधिकारी यांची भेट घेत मार्ग काढण्याची मागणी केली होती. आज देखील अनेकांनी उपोषणकर्ते यांना पाठिंबा दर्शविला. तसेच सर्व पत्रकार बंधू यांनी उपोषणकर्ते यांची बाजू लावून धरली, याबद्दल उपोषणकर्ते यांनी सर्वांचे आभार मानले.

       लोणावळा तलावाच्या समोर असलेल्या सहारा पुलाच्या पूर्वेकडील बाजूला सदरचा सर्वे नं. 54/2 व सर्वे नं. 53 आदी मालमत्ता आहे. यापैकी सर्वे नं. 54/2 मध्ये मंजूर ले आऊट मध्ये 30 ते 35 कुटूंब आहेत. त्यांना जाण्यासाठी पूर्वीपासून रेल्वे पाईप लाईन चा रस्ता आहे. त्याच ठिकाणी लोणावळा नगरपरिषदेचा डीपी रस्ता देखील आहे. हा रस्ता शेजारील व्यक्तीने भिंत बांधत बंद केला असल्याचा सदर रहिवाश्यांच्या आरोप आहे. तर 2021 सालापासून लोणावळा नगरपरिषदेने त्या व्यक्तीला सदर रस्त्यावरील भिंत काढत नागरिकांना रस्ता खुला करून द्या अशा नोटिसा बजावला आहेत. 2022 साली मा. उच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीने सदरचे बांधकाम काढण्याबाबत कारवाई करा असा आदेश लोणावळा नगरपरिषदेला दिला होता मात्र त्यावेळी नगरपरिषदेने वेळ काढूपणा केल्याने व संबंधित व्यक्तीने त्याचा फायदा घेत स्टे घेतल्याने नागरिकांवर आज आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे. एक खाजगी व्यक्ती लोणावळा नगरपरिषद व रेल्वे प्रशासन यांची कोणतीही परवानगी न घेता रेल्वेच्या जागेमध्ये अनधिकृतपणे भिंत बांधते तरी दोन्ही प्रशासन कारवाई करत नसल्याने या दोन्ही प्रशासनाच्या विरोधात सर्वे नं. 54/2 मधील नागरिक आमरण उपोषणाला तीन दिवसांपासून बसले होते.

इतर बातम्या