वरसोली ग्रामपंचायत च्या वतीने बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळा इमारतीचे उद्घाटन व सभामंडप व अंगणवाडी शाळेचे भूमिपूजन संपन्न
लोणावळा : वरसोली ग्रामपंचायत वतीने व स्वामी रामानंद शास्त्री चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या आर्थिक सहकार्यातून पांगळोली गावात बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे उद्घाटन तसेच आमदार निधी मधून बांधण्यात येणाऱ्या सभामंडप व अंगणवाडी शाळेच्या कामाचे भूमिपूजन स्वतंत्र दिनाच्या दिवशी मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते तसेच स्वामी रामानंद चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त विनोद अग्रवाल, विजय कुकरेजा, मनोज अग्रवाल, आर. डी. इराणी, पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती सभापती दिपाली हुलावळे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, वरसोली ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच संजय खांडेभरड, लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, जिल्हा परिषद सदस्य संतोष राऊत, पंचायत समिती सदस्य रेश्मा देवकर व योगेश लोहार, उपसरपंच नारायण कुटे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
स्वामी रामानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पांगळोली धनगर वस्ती या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा बांधण्यासाठी 60 लाख रुपये निधी दिला होता. यावेळी बोलताना सरपंच संजय खांडेभरड म्हणाले, वरसोली ग्रामपंचायत वतीने जवळपास साडेचार कोटी रुपयांची विकास कामे वेगवेगळ्या निधींमधून गावामध्ये केली आहेत. ट्रस्टने यापूर्वी वरसोली गावात देखील एक जिल्हा परिषद शाळा बांधण्यासाठी निधी दिला होता. तुंगार्ली धरणाकडून पांगळोली गावाकडे जाणारा रस्ता लवकरात लवकर बनवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी व अपेक्षा सरपंच खांडेभरड यांनी आमदार सुनील शेळके यांच्याकडे केली आहे.
यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, राजकीय पक्षभेद आणि जाती-पातीचे राजकारण बाजूला ठेवून, माझ्या मातीतील लोकांचे कल्याण आणि सर्वांगीण विकास करणे हेच माझे एकमेव ध्येय आहे. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी आपण अविरत प्रयत्न करत आहोत. याच विकासाच्या ध्यासामधून आज वरसोली ग्रामपंचायतीने त्यांच्या स्तरावर तब्बल ४ ते ५ कोटी रुपयांची विकास कामे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. दुर्गम वाड्या-पाड्यांपर्यंत पोहोचून तेथील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचे कौतुकास्पद काम आमचे सर्व सरपंच आणि स्थानिक लोकप्रतिनिधी करत आहेत. जे जे लोक विकासाच्या या प्रवासात मदत करतात, त्यांच्याकडे निरंतर पाठपुरावा करून प्रलंबित कामे मार्गी लावली जात आहेत.
निधी मिळवणे आणि अडचणींवर मात
शासनाकडून निधी मंजूर करून आणण्यासाठी किती हेलपाटे मारावे लागतात, याची मला पूर्ण कल्पना आहे. निधी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम करताना अनेक स्थानिक व तांत्रिक अडचणी येतात; परंतु कोणताही वाद-विवाद न निर्माण करता, सर्वांना सोबत घेऊन सरपंच संजय खांडेभरड व त्यांची टीम ही कामे सुरळीतपणे पूर्ण करत आहेत.
सामाजिक संस्था व दातृत्वाचा आदर्श
स्वामी रामानंद चॅरिटेबल ट्रस्ट अत्यंत शांतपणे, कोणतीही प्रसिद्धी न मिळवता समाजासाठी काम करत आहेत. त्यांची ही दातृत्वाची भावना खरोखरच सर्वांसाठी शिकण्यासारखी आणि प्रेरणादायी आहे. गावांमधील राहिलेली सर्व उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत असे आमदार शेळके यांनी सांगितले.
शिक्षणाचा दर्जा आणि सुंदर शाळा
आपल्या परिसरात अतिशय सुंदर आणि मॉडेल शाळा उभारण्यात आली आहे. परंतु एक कटू सत्य सांगावे वाटते की, आम्ही ठेकेदारांना कितीही फंड दिला तरी ते काही ना काही त्रुटी ठेवतातच. त्यामुळे माझी शिक्षकांना नम्र विनंती आहे की, ही शाळा जशी सुंदर बांधली आहे, तशीच ती पुढेही स्वच्छ, सुंदर आणि आल्हाददायक ठेवण्याची जबाबदारी आपण सर्वांनी पार पाडावी.
रस्त्याच्या कामाबाबत थेट इशारा आणि मुदत
पांगळोली गावाकडे येणार्या रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्याची निविदा प्रक्रिया (Tender) पूर्ण झाली आहे. तसेच यासाठी आवश्यक असलेली वन विभागाची परवानगीदेखील मिळाली आहे. पुढील ८ ते १० दिवसांत या रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू होईल आणि २ महिन्यांच्या आत हे काम पूर्ण करून दिले जाईल. ठेकेदाराने जर हे काम आगामी दिवाळीच्या आत पूर्ण केले नाही, तर संबंधित ठेकेदाराला यापुढे एकही काम दिले जाणार नाही. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि विश्वासाच्या बळावर आपण संपूर्ण क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास त्यांनी उपस्थित नागरिकांना दिला आहे.
या कार्यक्रमासाठी खरेदी-विक्री माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, लोणावळा नगरपरिषदेचे आरोग्य समिती सभापती धनंजय काळोखे, राष्ट्रवादीचे गटनेते नगरसेवक मंगेश मावकर, राष्ट्रवादीचे लोणावळा शहराध्यक्ष रवी पोटफोडे, माजी मुख्याध्यापक बापूलाल तारे, प्रभारी गटविकास अधिकारी सेवक थोरात, वरसोली ग्रामपंचायतचे सरपंच व उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अरविंद बालगुडे, मंदा पाटेकर, राहुल सुतार, नलिनी खांडेभरड, विजय महाडिक, रजनी कुटे, मीना शिद, सीता ठोंबरे, ग्राम विकास अधिकारी दीपक शिरसाट, मुख्याध्यापक महादू केदारी, केंद्रप्रमुख अविनाश लोमटे, शाळा इमारतीचे बांधकाम करणारे ठेकेदार राजू जानकर, माजी सरपंच राजू खांडेभरड, श्याम येवले, विलास खांडेभरड, केतन खांडेभरड यांच्यासह वरसोली व पांगळोली गावातील नागरिक व आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक सुभाष भानुसघरे यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच संजय खांडेभरड यांनी केले तर माजी सरपंच बबन खरात त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.



















