Breaking news

लोणावळ्यात देशभक्तीपर सुरांच्या साथीने माजी सैनिक, वीरपत्नींचा सन्मान; पूरग्रस्तांना मदतीचा हात

लोणावळा : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लोणावळा येथील महिला मंडळ सभागृहात ‘मेहता म्युझिकल’ व ‘एम अँड ए म्युझिकल अकॅडमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ या देशभक्तीपर गीतांच्या आणि सामाजिक उपक्रमांच्या विशेष कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या प्रसंगी माजी सैनिक व वीरपत्नींचा भावुक सन्मान करण्यात आला, तसेच पूरग्रस्तांना धान्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.

      कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित माजी सैनिक, वीरपत्नी तसेच धीरूभाई कल्याणजी, अरविंद भाई मेहता, मृदुला पाटील आणि संध्या गव्हले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर ‘ऐ मेरे प्यारे वतन’ या गीताने सांगीतिक सत्राचा प्रारंभ करण्यात आला.

        संदीप चित्ते, सुचित्रा चांदोरकर, रश्मी शिरस्कर, ज्योती रांगणे, पांडुरंग तिखे, गोरख चौधरी, अंशिका गोणते, रिषी नागर, जया गोडबोले, मंगल राणे, राजेश मेहता, आर्या बांदल, संतोषी बांदल, गुरुप्रसाद वासकर, अशोक गुगळे आणि अशोक साळवे या गायक कलाकारांनी एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेमाचा उत्साह भरला. बालकलाकार आर्या बांदल हिने सॅक्सोफोनवर ‘सारे जहाँ से अच्छा’ या गीताची धून वाजवून उपस्थितांची वाहवा मिळवली.

        देशाच्या रक्षणासाठी योगदान देणारे माजी सैनिक महेश थत्ते (CH A R A), बी. व्ही. कडू (MCPD), एच. सी. शर्मा (CH MECH), प्रसाद गद्रे (CH AT Army), महेश्वर भिंगे, पी. एस. ढाकरे, सानंद कुमार (PO ME) आणि वीरपत्नी नमिता पासी, सरोजकुमार, हेमलता शर्मा व रतन कदम यांना सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मेहता म्युझिकल्सचे संचालक राजेश मेहता व आर्या मेलडीजची गायिका आर्या बांदल यांना ‘लोणावळा संगीत रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. सहभाग घेतलेल्या सर्व गायक कलाकारांनाही सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

     केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न ठेवता, सामाजिक जाणीव जपत ‘लायन्स क्लब’च्या Let's Meet या संघटनेच्या माध्यमातून पूरग्रस्त बांधवांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाची उत्कृष्ट ध्वनी व प्रकाश व्यवस्था संदीप चित्ते यांनी सांभाळली, तर अनिल बांदल व प्रियांका बांदल यांनी कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले. कार्यक्रमाच्या मुख्य आयोजिका उमा मेहता यांनी या विशेष सोहळ्याचे आयोजन करून उपस्थितांना आनंद दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन रश्मी शिरस्कर यांनी केले. शेवटी समूहाने राष्ट्रगीत गाऊन या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली.

इतर बातम्या