Breaking news

स्वातंत्र्यदिनी कुसगाव जि. प. शाळेत ‘आकार’ कौशल्याचा श्रीगणेशा; रोटरी क्लब ऑफ लोणावळ्याचा स्तुत्य उपक्रम

लोणावळा : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कुसगाव जिल्हा परिषद शाळेत रोटरी क्लब ऑफ लोणावळाच्या वतीने ‘आकार – Pottery & Skill Development Centre’ या अभिनव कौशल्य विकास प्रकल्पाचा भव्य शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच कार्यानुभव, सर्जनशीलता आणि व्यावहारिक कौशल्ये मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

मातीकामातून कलागुण व रोजगाराची पेरणी

‘आकार’ प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थ्यांना मातीपासून पणत्या, पॉट्स आणि विविध सुशोभित उपयोगी वस्तू तयार करण्याचे रीतसर प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे विशेष प्रशिक्षण वर्ग दर शनिवारी शाळेत आयोजित केले जातील. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासोबतच, भविष्यात या कौशल्याचे रूपांतर उत्पादन व उत्पन्ननिर्मितीच्या संधींमध्ये करण्याचा मानस या वेळी व्यक्त करण्यात आला. ही संकल्पना कुसगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री. महादेव शेलार यांच्या पुढाकारातून साकारली असून ठाकूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे धडे दिले जातील. रोटरी क्लब ऑफ लोणावळाने पहिल्यांदाच असे 'स्किल डेव्हलपमेंट सेंटर' सुरू केले आहे.

क्रीडा आणि वाहतुकीला बळ: सायकली व टेनिस कोर्टची भेट

या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची सोय व्हावी व शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे म्हणून १० गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. याशिवाय, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी शाळेत प्रथमच टेनिस कोर्टची स्थापना करण्यात आली.

देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम

समारंभादरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते आणि नृत्यांचे बहारदार सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण कार्यक्रमात वेगळीच रंगत आली होती.

      या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य संतोष राऊत, रोटरी क्लब ऑफ लोणावळ्याच्या अध्यक्षा रो. ॲड. मोनाली कुलकर्णी-शेलार, IPP रो. विजया कल्याण, तसेच रो. आशिष मेहता, रो. नारायण शरवाले, रो. जयवंत नलोडे, रो. रवींद्र कुलकर्णी, रो. दिलीप पवार, रो. नितीन कल्याण, श्वेता देशमुख, ॲड. दिनेश शेलार, पूनम कदम, रोटरीचे सर्व सदस्य, कुसगावचे ग्रामस्थ, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“मुलांच्या हातांना कौशल्य, कल्पनाशक्तीला आकार आणि भविष्यासाठी आत्मविश्वास देणे हाच आमचा प्रयत्न असून रोटरीच्या ‘Create Lasting Impact’ या ध्येयाशी हा प्रकल्प कटिबद्ध आहे.”

— ॲड. मोनाली कुलकर्णी - अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ लोणावळा

इतर बातम्या