Breaking news

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदाचा परिविक्षाधीन उपअधीक्षक भूषण माने यांनी पदभार स्वीकारला

लोणावळा : राज्य लोकसेवा आयोगामार्फत २०२२ मध्ये पोलीस उपअधीक्षक पदावर निवड झालेले श्री. भूषण दत्तात्रय माने यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून आज कार्यभार स्वीकारला आहे. एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या (CPTP-१०) अनुषंगाने पुढील १३ आठवड्यांच्या कार्यकाळासाठी त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. 

       श्री. भूषण माने हे मूळचे ईश्वरपूर, सांगली येथील रहिवासी असून, त्यांनी सन २०२२ च्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली होती. पुढील तीन महिन्यांच्या म्हणजेच १३ आठवड्यांच्या कालावधीत त्यांच्यासमोर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध आव्हाने असणार आहेत. यात प्रामुख्याने वर्षा ऋतूतील पर्यटन बंदोबस्त, आगामी गणेशोत्सव बंदोबस्त आणि नवरात्रोत्सवा दरम्यान होणारा प्रसिद्ध श्री एकवीरा देवी यात्रेचा बंदोबस्त यांचा समावेश आहे. यासोबतच मावळ तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी आणि अवैधरीत्या विक्री केल्या जाणाऱ्या अंमली पदार्थांच्या व्यवसायाला पूर्णपणे प्रतिबंध घालण्याचे मोठे आव्हानही त्यांच्यासमोर असेल.

       पोलीस ठाण्याचा कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांनी हद्दीतील अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परिसरात कोणत्याही प्रकारच्या अवैध व्यवसायांची किंवा संशयास्पद हालचालींची माहिती सुजाण नागरिकांनी कोणत्याही भीतीशिवाय थेट पुढे येऊन द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. यासाठी नागरिकांनी आपल्याकडील माहिती ९४२३५२८७०१ या मोबाईल क्रमांकावर कळवावी, असे पोलीस उपअधीक्षक भूषण माने यांनी सांगितले आहे.

इतर बातम्या