लोणावळा शहरात सोमवारी 78 मिमी पाऊस; पावसाने मागील वर्षीची सरासरी ओलांडली

लोणावळा : लोणावळा शहरात सोमवारी (13 सप्टेंबर) रोजी 78 मिमी पावसाची नोंद झाली. यावर्षीच्या पावसाने मागील वर्षीची एकूण पावसाची सरासरी ओलांडली आहे. यावर्षी आज अखेर 167.91 इंच इतका पाऊस झाला आहे.
गणपती बाप्पां आगमनाच्या दोन दिवस अगोदर पासून लोणावळा खंडाळा व मावळात पावसाचे पुर्नरागमन झाले आहे. दररोज जोरदार व संततधार पाऊस सुरू असल्याने गणेश भक्तांना व नागरिकांना घराबाहेर पडणे दुरापास्त झाले आहे. सोमवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. रात्री साडेसातनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली. लोणावळा शहरात आज अखेरपर्यंत 4265 मिमी (167.91 इंच) पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी एकूण 4222 मिमी (166.22 इंच) पाऊस झाला होता. ही सरासरी पावसाने ओलांडली असून पावसाची द्विशतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे.
जोरदार पावसाने मावळातील पवना, आंद्रा, कासारसाई, वडिवळे ही सर्व धरणे 100 टक्के भरली आहेत.