Breaking news

कान्हे फाटा–टाकवे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मनसे आक्रमक; रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका; तातडीने दुरुस्तीची मागणी

कान्हे मावळ (प्रतिनिधी) : कान्हे फाटा ते टाकवे बुद्रुक या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली असून वाहनचालक व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष अशोकभाऊ कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी सार्वजनिक बांधकाम वडगाव मावळ विभागाकडे निवेदन देत रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली.

या वेळी उपाध्यक्ष बबन आलम, निरांजन चव्हाण, मोजेसदास भाई, अनिल लालगुडे, सुनील साळवे, ज्ञानेश्वर वाळुंजकर, शंकर गावडे, सुमीत गावडे, नाथा पिंपळे, आकाश पारखी तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

कान्हे फाटा–टाकवे मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसून दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी हा मार्ग अधिक धोकादायक ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नवीन इंद्रायणी पुलाच्या दुरवस्थेचाही मुद्दा

टाकवे बुद्रुक येथील नवीन इंद्रायणी पुलाच्या दोन्ही बाजूंना खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक तसेच पर्यटकांची ये-जा होत असल्याने प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

तात्पुरती डागडुजी न करता रस्त्याची कायमस्वरूपी व दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा प्रश्न तातडीने सोडवला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक आंदोलनाची भूमिका लवकरच घेईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

इतर बातम्या

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने दरडग्रस्तांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला मंत्री महाजनांच्या तातडीच्या सूचना