Lonavala Rotary Club News l रोटरी क्लब ऑफ लोणावळा च्या वतीने सावित्रीच्या लेकींना मोफत सायकली वाटप
लोणावळा : रोटरी क्लब ऑफ लोणावळा च्या वतीने लोणावळा शहरातील सावित्रीच्या लेकींना मोफत सायकली वाटप करण्यात आले आहेत. दूरवरून पायपीट करत लोणावळा शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या दहा मुलींची निवड करत त्यांना या सायकली देण्यात आले आहेत. सायकली मिळाल्यामुळे या मुलींची शाळेत येण्याची व घरी जाण्याची पायपीट वाचणार असून त्यांना अधिकचा वेळ शिक्षणासाठी देता येणार आहे. लोणावळा शहरामध्ये विविध शाळा महाविद्यालय आहेत मात्र या ठिकाणी शिकायला येणारे विद्यार्थी हे शहरासोबतच ग्रामीण भागातून देखील मोठ्या संख्येने येत असतात. अनेक दूरवरची गावे व वाड्यावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्यासाठी प्रवासाची सुविधा नसल्यामुळे अथवा आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना पायपीट करत शाळेत यावे लागते. मुलींना त्यांची शैक्षणिक गरज भागवण्यासाठी रोटरी क्लब ऑफ लोणावळ्याच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे.
यामध्ये लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयामध्ये शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनी, व्ही पी एस हायस्कूल येथे शिकणारी एक विद्यार्थिनी व डॉ. बी एन पुरंदरे या शाळेमध्ये शिकणाऱ्या चार विद्यार्थिनी यांचा समावेश आहे. सदरच्या सायकली या रोटरी क्लब ऑफ पुणे येथील माजी अध्यक्ष रोटेरियन कैलास मोंगा, रोटरी प्रेसिडेंट रोहित मित्रा, हिंदुजा गुल, शर्मिला अतुल पारेख यांनी पुरस्कृत केल्या होत्या.
लोणावळा रोटरी क्लबच्या माजी अध्यक्ष विजया कल्याण, नूतन अध्यक्ष ॲड. मोनाली कुलकर्णी, प्रोजेक्ट डायरेक्टर नारायण शारवाले, माजी अध्यक्ष रवींद्र कुलकर्णी, आशिष मेहता, पुंडलिक वानखेडे, धीरूभाई कल्याणजी, दुरय्या रामपुरवाला, नितीन कल्याण, ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष मृदुला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.





















