Breaking news

Lonavala News l साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा त्वरित बसवा; लोणावळा नगरपालिकेला रिपब्लिकन पक्षाचा इशारा

लोणावळा : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धपुतळ्याचे भूमिपूजन करून १ ऑगस्ट २०२६ ला एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अद्यापही या पुतळ्याचे अनावरण झालेले नाही. या विलंबामुळे संतप्त झालेल्या रिपब्लिकन पक्षाने लोणावळा नगरपालिकेला खणखणीत इशारा दिला असून, पुतळा त्वरित बसवण्यात न आल्यास पुन्हा 'घंटा मोर्चा' काढण्याचा इशारा दिला आहे.

      लोणावळा नगरपालिकेच्या वतीने अत्यंत उत्साहात अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धपुतळ्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, एका वर्षानंतरही पुतळ्याचे काम पूर्ण न होणे आणि अनावरण न होणे, ही दुर्दैवी बाब आहे. दरम्यान, पुतळा बसवण्यासाठी लागणारी महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळवण्यात लोणावळा नगरपालिका अद्याप अपयशी ठरली आहे, अशी माहिती समोर येत आहे.

        समस्त मातंग समाजाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा लोणावळा नगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आला आहे. पुतळा उपलब्ध असूनही केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे अनावरण रखडल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही पुतळ्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाने नगरपालिकेवर घंटा मोर्चा काढला होता. आता पुन्हा एकदा या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेत रिपब्लिकन पक्षाने प्रशासनाला ताकीद दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश आरपीआय (आठवले) चे सचिव व माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी या संदर्भात भूमिका मांडताना सांगितले की, नगरपालिकेने तातडीने पुतळा अनावरणाची कार्यवाही पूर्ण करावी. अन्यथा, प्रशासनाला पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाच्या तीव्र घंटा मोर्चाला सामोरे जावे लागेल. आता नगरपालिका प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्या