Breaking news

Lonavala News : भांगरवाडी विभागातील रस्ते तात्काळ पूर्ववत करा अन्यथा नगर परिषदेवर जनप्रक्षोभ मोर्चा काढणार - देविदास कडू

लोणावळा : लोणावळा नगर परिषदेच्या वतीने भांगरवाडी विभागात सुरू असलेले ड्रेनेज लाईन काम अतिशय संत गतीने सुरू आहे. लोणावळा नगरपरिषद प्रशासनाचा कसलाही वचक ठेकेदारांवर राहिलेला नसल्यामुळे ठेकेदार कामांमध्ये चालढकलपणा करत असून त्याचा फटका विनाकारण नागरिकांना बसत आहे. मागील एक ते दीड महिन्यापासून भांगारवाडी विभागातील नागरिक तसेच कुसगाव व नांगरगाव भागातून येणारे नागरिक यांना या भुयारी गटर योजनेच्या कामाचा फटका बसत आहे. लोणावळा नगरपरिषदेने दहा ते पंधरा दिवसात काम पूर्ण होईल असे सांगून कन्या शाळेपासून कामाला सुरुवात केली मात्र प्रत्यक्षात एक महिना उलटून गेला तरी काम अपूर्णच आहे. ठेकेदार मनमानी पणाने काम करत आहे तर लोणावळा नगरपरिषद प्रशासनला नागरिकांचे कोणतेही देणे घेणे राहिलेले नसल्याने त्यांच्याकडून या कामांकडे अक्षरशः दुर्लक्ष सुरू असल्याचा आरोप भांगरवाडी विभागाचे माजी नगरसेवक व भाजपाचे गटनेते देविदास कडू यांनी केला आहे.

भुयारी गटाची लाईन टाकण्याकरिता खोदण्यात आलेले रस्ते अद्याप सुद्धा योग्य प्रकारे बुजवले गेलेले नाही. यामुळे या रस्त्यावरून जाताना नागरिकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. त्यातच धुळीचा मोठा सामना नागरिक करत आहेत. सदर कामाकरता रस्ते खोदताना अनेक ठिकाणी पाण्याच्या लाईन तुटल्या गेल्याने नागरिकांना तो देखील मनस्ताप सहन करावा लागतो आहे. लोणावळा नगरपरिषदेने तात्काळ सात दिवसाच्या आत भांगरवाडी विभागातील खोदलेले रस्ते पूर्ववत डांबरी करावेत अन्यथा लोणावळा नगर परिषदेवर जनप्रक्षोभ मोर्चा काढण्याचा इशारा देविदास कडू यांनी दिला आहे. कडू म्हणाले विकासकामे सुरु असताना काहीशी गैरसोय होते मात्र सदर कामे वेळेत पुर्ण करत नागरिकांना दिलासा देणे क्रमप्राप्त असताना लोणावळा नगरपरिषद प्रशासनाकडून असे प्रयत्न होताना दिसत नाही. ठेकेदार पोसण्याचे काम प्रशासनाकडून सुरु असल्याचा आरोप देविदास कडू यांनी केला आहे. कडू म्हणाले खरंतर ही विकासकामे आमच्या काळात मंजुर झाली होती. कामाचा निधी देखील वर्ग झालेला असताना केवळ प्रशासन व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे कामे रेंगाळली असल्याचा आरोप केला आहे.

इतर बातम्या