आनंदवार्ता : शिधापत्रिका धारकांना गौरी गणपती व दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा मिळणार
मुंबई : राज्यातील शिधापत्रिका धारकांना गौरी गणपती, दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल असा हा शिधा अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) व केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येईल.
हा शिधा जिन्नस 19 सप्टेंबर रोजी गौरी गणपती उत्सवानिमित्त व त्यानंतर 12 नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या दिवाळी निमित्त वितरित करण्यात येईल.
राज्यातील एकूण 1 कोटी 65 लाख 60 हजार 256 शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल. या खरेदीसाठी घाऊक बाजारातील दर व अनुषंगीक खर्चासह 827 कोटी 35 लाख इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली. प्रती संच 239 रुपये या दराने हा शिधा जिन्नस संच खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे.