Thackeray - Rane : सिंधुदुर्गात राणे - ठाकरेंची जोरदार राजकीय फटकेबाजी; चिपी विमानतळाचे उद्घाटन

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या राजकारणात कधीकाळी शिवसेनेत एकत्र असणारे दोन दिग्गज नेते आज एकमेकांचे कट्टर विरोधक झाले आहेत. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कायमच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करत आले आहेत. मागील महिन्यात असेच एक वक्तव्य त्यांच्या अंगलट आलं होतं. आणि त्यानंतर त्यांचं अटकसत्र या पार्श्वभूमीवर आजचा हा कार्यक्रम आणि त्यांचं एका मंचावर येणं याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. दरम्यान उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात अखेर अपेक्षित पद्घतीने राजकीय जुगलबंदी रंगताना पाहायला मिळाली.
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नाही, आनंद व्यक्त करण्याचा आहे. कोकणाच्या मातीत बाभळी आणि आंब्याची दोन्ही झाडं उगवतात. त्यामध्ये मातीचा दोष नसतो. त्यामुळे कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. नारायण राणे यांनी व्यासपीठावरून हाणलेल्या जवळपास प्रत्येक टोल्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिटोला लगावला.
माझ्या आयुष्यातील हा चांगला क्षण आहे. अशा ठिकाणी राजकारण करू नये असं वाटत होतं. जावं, शुभेच्छा द्याव्या आणि सिंधुदुर्गातून विमान उडताना डोळेभरून पाहावं असं वाटलं. त्यासाठी आलो. मंचावर आल्यावर मुख्यमंत्री भेटले. ते माझ्या कानावर काही तरी बोलले. मी एक शब्द ऐकला. असो, असं राणे म्हणाले.
अनुभवाने बोलणं वेगळं - ठाकरे
काही लोक पाठांतर करुन बोलतात, पण अनुभवाने बोलणं वेगळं असतं. मनातील मळमळ बोलून दाखवणे हे तर त्यापेक्षाही वेगळं असतं. आज या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. इतका चांगला क्षण असताना त्याला गालबोट लागू नये म्हणून एक काळं तीट असावं लागतं, तशीच काही लोकं आज याठिकाणी आहेत, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
नाव घेतलं तर राजकारण होईल - राणे
उद्ववजी विनंती आहे. याच जागेवर मी भूमिपूजन करायला आलो. त्यावेळी आंदोलन होत होतं. भूमिसंपादन करून देणार नाही. आम्हाला विमानतळ नको. आपल्या त्यावेळच्या राजवटीत मी मंजूर केलं. किती विरोध किती विरोध, मी नाव घेतलं तर राजकारण होईल.
नाही तर कोणीतरी म्हणेल तो किल्ला मीच बांधला - ठाकरे
कोकणाच्या विकासाचे शिल्पकार आपणच, नारायण राणेंनी दावा केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. मी एरियल फोटोग्राफी करत होतो. महाराजांचे किल्ले. निदान सिंधुदुर्गाचा किल्ला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नाहीतर कोणतरी म्हणेल की तो किल्लाही मीच बांधला.
आदित्य माझ्यासाठी टॅक्स फ्री - राणे
सन्मानिय आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री आहेत. त्यांनी अभ्यास करावा. त्यांनी टाटाचा रिपोर्ट वाचावा. आदित्य माझ्यासाठी टॅक्स फ्रि आहे. मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, असे राणे म्हणाले.
खोटं बोलणार्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतू बाहेर काढले - ठाकरे
नारायण राणे यांनी आपल्या भाषणात, ‘बाळासाहेबांना खोटं बोलणं कधी आवडलं नाही. खोट्याला त्यांनी थारा दिला नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावरुनही उद्धव ठाकरे म्हणाले, नारायणराव, बाळासाहेबांना खोटं बोलणारी लोकं आवडत नाहीत, हे खरंच आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी तेव्हाच अशा लोकांना शिवसेनेतून बाहेर काढले होते, हा सुद्धा इतिहास आहे. कटू असलं तरी चालेल पण खरं आहे.
साहेबांचे श्रेय.. मी निमित्त होतो - राणे
जिल्ह्याला 80-90 लाख यायचे मी तेव्हा 100 कोटी दिले. सुविधांसाठी कारणीभूत नारायण राणे आहे, दुसरा कोणी जवळ येऊच शकत नाही. इथल्या शाळा वर्ग, इथे मी एकाचवेळी 340 शिक्षक आणले, राज्यात पहिल्या टॉपमध्ये सिंधुदुर्गातील विद्यार्थी होते. त्याला कारणीभूत कोण हे जनतेला माहितीय त्याचे श्रेय मी घेत नाही, त्यावेळी शिवसेनेत होतो, साहेबांचं श्रेय होतं मी निमित्त होतो. जसं सचिन बॅटिगं करतो. पण स्वत: श्रेय घेत नाही. स्कोर केला ते बॅटने केला असं तो सांगतो. तसंच मी काही केलं नाही. मला शिवसेनाप्रमुखांनी संधी दिली. मी केवळ निमित्त मात्र ठरलो, असंही त्यांनी सांगितलं.
लघु का असेना, सुक्ष्म का असेना तुम्हाला मोठं खातं दिलंय - ठाकरे
आपण केंद्रात मंत्री आहात. लघू का असेना सुक्ष्म का असेना पण मोठं खातं आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राला नक्की करुन द्याल ही तुमच्याकडून मला अपेक्षा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.