Breaking news

Vadgaon Maval : वडगाव पैसाफंड साखळी रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण कामासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्या - नगरसेविका सायली म्हाळसकर

वडगाव मावळ : वडगाव नगर पंचायत हद्दीतील वडगाव पैसाफंड काचकारखाना  साखळी रस्त्यावर मागील काही वर्षांपासून आजूबाजूच्या औद्योगीक व वाढत्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. मावळ व इतर तालुक्यातील नागरीक, प्रवासी, विद्यार्थी, कामगार, शेतकरी हे सुरक्षित व सोईस्कर मार्ग म्हणून या रस्त्याचा वापर करत असतात. सदर वाहतुक व रोजच्या दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता सध्याच्या परिस्थितीला खूपच अपुरा व अरुंद पडत असून त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी व डांबरीकरणासाठी भरीव निधी द्यावा अशी मागणी मनसे नगरसेविका सायली रुपेश म्हाळसकर यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे केली आहे.          

      ऐतिहासिक नोंद असलेल्या या साखळी रस्त्यावर आजही पूर्वीच्या काळातील पाऊलखुणा व वाटा आढळून येतात, पैसाफंड काचकारखाना, ईगल फ्लस्क, नवीन समर्थ विद्यालय, तळेगाव जनरल हॉस्पिटल व चाकण रस्ता या ठिकाणी जाण्यासाठी प्रामुख्याने या रस्त्याचा वापर केला जात असे. याच पाऊलखुणा व वाटा अधिक ठळक व मजबूत करण्यासाठी तसेच नियोजित रिंगरोड व झपाट्याने वाढत चाललेल्या नागरीकरणाचा विचार लक्षात घेता आगामी काळात या रस्त्याला मोठे महत्व प्राप्त होणार आहे.  पुढील काही वर्षांची गरज ओळखून व दूरदृष्टी ठेऊन शहराचे अर्थकारण आणि विकास साधण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करणे गरजेचे आहे व ते करत असताना प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 16 मधून म्हणजेच खंडोबा मंदिर ते एम.आय.डी.सी  रोड पर्यन्त जाणाऱ्या रस्त्याबाबत विकासात्मक धोरण ठेऊन व त्याची आखणी करुन कायम स्वरूपी पद्धतीने विकासकामे करण्यात यावी. त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन द्यावा तसेच सदरच्या रस्त्याबाबत खालील बाबीचा समावेश करण्यात यावा असे या निवेदनात म्हटले आहे.

• रस्त्याच्या बाजूस असणाऱ्या वीज वाहक तारा (केबल) भूमिगत करणे. 

● रस्त्याच्या मधोमध मोठ्या आकाराची सांडपाणी व्यवस्था करणे. 

● रस्त्याच्या एका बाजूने  पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी टाकणे. 

● प्रस्तावित डी. पी. आराखड्यानुसार 18 मिटर असणारा रस्ता कमीत कमी 12 मिटर करण्यात यावा. 

● रस्त्याच्या एका बाजूस फूटपाथ व दुसऱ्या बाजूस झाडे लावून सुशोभीकरण करण्यात यावे. 

● रस्त्याच्या ठराविक अंतरावर स्वछतागृह ( ई-टॉयलेट), बसथांबा (निवाराशेड व बाकडे) असावेत.

● रस्त्याच्या एका बाजूस आधुनिक पथदिवे व सी.सी.टी.वी बसविण्यात यावेत. 

● रस्त्याच्या सुरुवातीस  (दोन्ही बाजूस ) प्रवेशद्वार उभारण्यात यावे.  

     या सर्व बाबींचा विचार जर या रस्त्याच्या कामात झाला तर नक्कीच वडगाव शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडेल व विकासाचे मॉडेल म्हणून वडगाव शहर उदयास येईल असा विश्वास या पत्रात व्यक्त करण्यात आला. या वेळी बोलतांना आमदार सुनील शेळके यांनी या रस्त्याच्या कामास जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले असल्याचे सायली म्हाळसकर यांनी सांगितले.

इतर बातम्या