Breaking news

Political News : एकनाथ शिंदेच्या भुमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरता; शिंदेच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : शिवसेनेचे महत्वाचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी कालचे विधानपरिषदेचे मतदान झाल्यानंतर तब्बल तीन डझन मंत्र्यासह नाॅट रिचेबल होत सुरत गाठल्याने महाराष्ट्रात मोठी राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. शिंदे यांनी महाविकास आघाडीमधील नाराजी उघड केली असून हिंदूत्वाच्या मुद्द्यावर भाजपासोबत पुन्हा युती करण्याची मागणी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रात आजचा दिवस उजडला तो एकनाथ शिंदे नाॅट रिचेबल झाल्याच्या बातमीने, पुढे दिवसभर हाच विषय टीआरपीचा ठरला. सकाळच्या सत्रात नेमके किती आमदार शिंदे यांच्यासोबत आहेत याबद्दल स्पष्टता नसल्याने केवळ अंदाज व्यक्त केले जात होते. सायंकाळी मात्र 36 आमदार शिंदे यांच्या सोबत असल्याचे समोर आले. शिंदे यांनी त्यांची नाराजी व्यक्त करताना मी बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे साहेबांचा शिवसैनिक असल्याचे म्हंटले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्यामुळे शिवसेनेचे व शिवसैनिकांचे नुकसान होत असल्याने हिंदुत्वाच्या मुद्दयावर भाजपासोबत युती करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी तुम्ही मुंबईत या आपण बसून चर्चा करू असे म्हंटले आहे. रश्मी ठाकरे यांनी देखिल शिंदे यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या वतीने मिलिंद नार्वेकर यांनी सुरत मध्ये जाऊन शिंदे यांची भेट घेतली व चर्चा केली. भाजपाचे नेते देखील सुरत मध्ये दाखल झाले असून पुढील घडामोडीवर महाराष्ट्रातील राजकीय भवित्य अवलंबून असल्याने सर्वांच्या नजरा एकनाथ शिंदे यांच्या भुमिकेकडे लागल्या आहेत. शिंदे यांची मनधारण करण्यात शिवसेनेला यश येणार की शिंदे नाराज आमदारांसह भाजपाच्या गळाला लागणार हे पाहणे औत्स्युक्यचे ठरणार आहे. ज्या काँग्रेस व राष्ट्रवादी सोबतच्या महाआघाडीवरून हे नाराजी नाट्य घडले आहे, त्या दोन्ही पक्षांनी हा शिवसेनेचा अंतर्गत विषय असल्याचे म्हणत सावध पवित्रा घेतला आहे.

इतर बातम्या