Breaking news

Lonavala News : श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त 14 सिद्ध चरण पादुकांचे लोणावळाकरांनी घेतले दर्शन

लोणावळा : ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ यांचा प्रकटदिन सोहळा लोणावळ्यात मोठ्या उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. श्री स्वामी समर्थ शंकर चिले सेवा परिवार लोणावळा यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळ्यानिमित्त 14 सिद्ध पादुका दर्शनासाठी लोणावळ्यात आणल्या होत्या. त्या पादुकाच्या दर्शनाचा लाभ लोणावळाकरांनी घेतला. तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक अजित कडकडे यांचे गायन व भक्तीगीते ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 22 व 23 मार्च रोजी भांगरवाडी येथील सुमित्रा हॉल मध्ये दोन्ही कार्यक्रम पार पडले.

      श्री स्वामी समर्थ महाराज, श्री शंकर बाबा महाराज, श्री चिले महाराज, श्री साईनाथ महाराज, श्री गजानन महाराज, श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, समर्थ रामदास स्वामी, श्री साई गगनगिरी महाराज, श्री चैतन्य कानिफनाथ महाराज, श्री बाळूमामा, श्री दत्तगुरु गिरनारी, श्री सद्गुरु शिवाजी महाराज विडणी, जगद्गुरु संत तुकाराम महाराज या विभूतींच्या चरण पादुका याठिकाणी दर्शनासाठी आणण्यात आल्या होत्या. हजारो नागरिकांनी दर्शनाचा तर जवळपास अडीच हजार नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री प्रशांत कळसकर यांनी जतन केलेल्या सद्गुरु शंकर महाराज धनकवडी व सद्गुरु शिवाजी महाराज विडणी यांच्या मूळ वापरलेल्या चर्म पादुका व श्री अभ्यंकर पुणे यांच्याकडील सदगुरू चिले महाराज यांनी वापरलेल्या टोपी देखील दर्शनासाठी आणण्यात आले होते. 23 मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता भाषा वैभव हभप संदिपान महाराज शिंदे यांची कीर्तन सेवा पार पडली. श्री स्वामी समर्थ शंकर चिले सेवा परिवार, लोणावळा यांनी या कार्यक्रम‍ांचे आयोजन केले होते.

स्वामी समर्थ मठात दर्शनासाठी रांगा

नांगरगाव येथील श्री स्वामी समर्थ मठात प्रकटदिन सोहळ्यानिमित्त गुरुवारी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. स्वामी समर्थ मठ व शेजारी असलेल्या अन्नछत्र या दोन्ही ठिकाणी दिवसभर भाविकांची गर्दी पहायला मिळाली.

इतर बातम्या